लोणी । झुंझार न्यूज

 

 

 

सद्गुरु आनंदा बाबा यांचे पदस्पर्शाने पुनीत झालेले अन् रक्ताच्या नात्याची घट्ट वीण असलेले व दुर्गामातेचे जागृत देवस्थान ओळख त्या नावाने जपणारे महाराष्ट्रातले एकमेव असे तीन हजार लोकवस्तीचे माझे गाव दुर्गापूर. अशा गावातील “संत कृपा झाली इमारत फळा आली” असा आगळा वेगळा जीवन प्रवास संसार प्रपंच असलेले श्री बबन जगन्नाथ पुलाटे ते ह .भ. प. बबनदादा पुलाटे हे व्यक्तिमत्व.

 

 

त्यांचे देव उठनी एकादशीला वृद्धाप काळी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या जीवन प्रवासा विषयी चार शब्द.
चार खोल्यांची सात वर्गाची आमची जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळा . त्यामुळे मोठें वर्ग खोलीत तर छोटे वर्ग आनंदाबाबा मंदिरात. अशा पहिलीच्या वर्गात बापूसाहेब बबन पुलांटे व आम्ही होतो. हाकेच्या अंतरावर घर व आनंदा बाबाचे भक्त शंकरबाबा यांचे गाडीवान असलेले जगू बाबा हे बापूसाहेब विलास राजू व शरद यांचे आजोबा. त्यामुळे बापूसाहेब सर्वांना आवडायचा.कारण बापूसाहेबामुळे वर्गाची नाळ या थोर जाण्यात्याशी जुळली जायची. अशा माझ्या वर्ग बंधूचे वडील म्हणजे बबन दादा.त्यामुळे शाळे समोरचे त्यांचे छपराचे घर व त्या शेजारचे गच्च भरलेले भोकराचे झाड अन् समोरची मोठी गाव कारभाराला सावली देणारी डेरेदार चिंच व त्या खालची गावच्या माणसाची गर्दी हे आमचे त्यावेळचे जीवन शिक्षण विद्यापीठ. तेथे भले बुरे दोन्हीही गोष्टी होत असत. शिकण्याच्या वयात हा फरक लक्षात येत नसायचा. त्यामुळे जे दिसेल ते पहायचे व जे ऐकू येईल ते ऐकायचे या तत्त्वाने आम्ही घडत गेलो. त्यातील लक्षात राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे बबनदादा. “संत संगतीचा काय वर्णू महिमा ” याची प्रचिती कशी असते घडते याचे ज्वलंत आदर्श उदाहरण म्हणजे आम्ही पाहिलेले वेगळ्या अर्थाने स्वानंदे छंदीफंदी नाटक वेडे बबनदादा ते हेच का ? असे ते आज संवादिनी सोबत कीर्तन भजनात तल्लीन झालेले साथ देणारे बबनदादा असा प्रश्न पडावा इतका झालेला व्यक्तिमत्व बदल होय. उमेदीच्या काळी त्यांनी व त्यांचे सहकारी बबन रामभाऊ कदम कारभारी महादू दंडे आदींनी बसविलेले नाटक पाहायला रात्री गावात गेलो. आपल्या गावातील ही माणसे ओळखू येईनात ते कोणते पात्र करतात. इतके चांगले त्यांनी ते वठविले होते. इतके गुणी कलाकार साठ सत्तर वर्षापूर्वी दुर्गापूर गावात होते .जर त्यांना योग्य संधी लाभली असती तर नाट्य व चित्रपट क्षेत्रात दुर्गापूर गाव व दुर्गापूरकर नक्कीच आज आघाडीवर दिसले असते.पण देवाचे नियोजन काही वेगळेच असावे. हार्मोनियम तीच वाजविणारा हातही तोच पण निघणारे स्वर गाण्या लावणी ऐवजी संत कृपेने भजनाचे भक्ती सुर आळवू लागले. त्यांच्या या विलक्षण प्रवासाच्या आठवणीना उजाळा देताना मन भरून येते.

 

 

बांधाची पाऊलवाट हाच १९७३- ७४ च्या काळात गावचा महामार्ग अशा महामार्गांने आजोबांच्या पाठकुळी बसून सकाळ दुपार शाळेत जाणारा चालता न येणारा मी.असेच दुपारच्या शाळेला जाताना गावातली चार माणसे चारीच्या कडेच्या वावरात चिखलात लोळन घेतल्याने ओळखू न येण्यासारखी झालेली. आजोबांना विचारले “बाबा हे असे कम्हून करू राहिले” तर ते म्हटले त्यांचा पाय घसरला आणि ते पुढे चालू लागले. शाळा सुरू झाली व संपली तरी *पाय घसरला” हे शब्द कळले नाही. वय वाढले अनुभव येत गेले तेंव्हा कळले ते तसे का करत होते. तर त्यांनी वेगळ्या अर्थाने छंद पूर्ती केल्याने ते स्वानंदात मग्न होते. पण त्याचा कोणताच सुगावा लागू नये म्हणून आजोबांनी वापरलेला “पाय घसरला” हा शब्द व परिस्थितीतून घसरलेला पाय सावरून नव्याने उभे राहिलेले भक्ती मेळ्यात दंग झालेले बबनदादा म्हणजे समाजासाठी इच्छा असेल बदल नक्की होतो असा एक वेगळा सामाजिक आदर्श उदाहरण ठरले.

 

 

 

सद्गुरु गंगा गिरीजी महाराज यांचे आशीर्वादाने व सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांचे सहवासाने गावकऱ्यांनी त्याच दरम्यान गावात सुरू असलेला हरिनाम सप्ताह व त्याचा परिणाम म्हणून “लावणी भुलली अभंगाला” असा प्रकार घडला. नाटकात गाण्याच्या चालीवर हार्मोनियमवर लीलया फिरणारी बोटं त्याच हार्मोनियमवर अभगाची सात्विक साथ करू लागले. संत संग वाढत गेला. महर्षी नारदाच्या एका शब्दाने वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसा चमत्कार घडला. बबन दादांनी तुळशी माळ धारण केली. बबनदादा पंढरीचे वारकरी झाले.”तुका म्हणे घालू तयावरी भार” या दृढ निष्ठेने ते भजनासाठी पायाला भिंगरी बांधून गावोगावी जावू लागले. श्रवण भक्तीने ते जमेल तसे प्रवचन निरूपण देखील करू लागले. कधी कधी प्रवासाहून परत येताना बबन दादा लोणी येथे प्रवरा बँक जवळ उभे असायचे मी तीनचाकी सायकलवर असताना कधी मधी चिखला पाण्यात अडकलेली माझी सायकल पुढे लोटणारे माझे जुने प्रेमळ दुर्गापूरकर डोळ्यासमोर उभे राहत व माझ्याही नकळत आजची माझी गाडी बबन दादा जवळ येऊन थांबे.थांबली की दादा म्हणणार सर तुम्हाला जमेल का ? त्रास नको व्हायला तुम्हाला. प्रवासाचा शिन दगदग विसरून माझी कळजी करणारे माझ्या गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा सहवास मला लाभला हे माझे भाग्य.काळजी करू नका नक्की जमेल. मग दादा मागे बसत.लोणी ते हसनापुर बर्डी रस्ता एवढे अंतर बोलायला पुरत नसायचे कारण “विषय तो त्यांचा झाला नारायण ‘ ” असे आम्ही वळणावर थांबून बोलत असू.त्यांचीं सवड व माझी अध्यात्म आवड यामुळे घटका सरे.मग माझ्या लक्षात आल्यावर दादा तुम्ही प्रवसावरून आलात आराम करा आता . मग बोलणे संपे. विषय हाच या महाराजांनी हा अभंग सोडवला त्यात त्यांनी हे तत्त्व सांगितले असे तत्व जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे बबनदादा.

 

 

पंधरा वीस दिवसापूर्वी दादा अंगणात बसलेले होते जाताना जय हरी म्हटले घाईत असल्याने बोलणे झाले नाही ही खंत तशीच राहिली. हे सर्व होत असताना परमार्थात रमून गेलेले दादा घरात कमी व भजनात जादा असे घडू लागले.त्याचाच परिणाम म्हणून आदर्श माता सौ.सिंधुताई एकनाथराव विखे पाटील व अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या महिला सक्षमीकरण व समाज विकास यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या मा अध्यक्षा नामदार सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या वस्तीवरील भजनात संवादिनी संगतीची जबाबदारी दादांना पूर्ण करणे कामी मागणी झाली. त्यांनी ती हसत मुखाने स्वीकारून यशस्वी पूर्ण केली. त्यामुळे त्यांचा या परिवाराशी स्नेह वृद्धिंगत झाला. यामुळे या गुणी वारकऱ्यांचा “संसार सुखाचा झाला गे माये” असे कौटुंबिक जीवन लाभले.दक्षिण नगर मध्ये दादांचां चाहता परीवार मोठा असल्याचे साहित्य सेवा कार्याने आकाशवाणी भेटीत कळले. अडचणीत विखे पाटील परीवार पाठीशी उभा राहिला नाही असे कधीच होत नाही.दादांनी देवावर ठेवलेला विश्वास या देव माणसांनी सुख दुःखात सहकार्य करून सार्थ ठरविला. त्यांची पत्नी मुले नातवंडे यांनी मुलगा विलास व नातू यांच्या जाण्याचा आघात सोसूनही खंबीरपणे उभे राहिले आहेत.

 

 

त्यांचा समाज सेवेचा वारसा जपणारा नातू व दुर्गापूरकर परिवाराच्या कार्यात समन्वयक म्हणून नेहमी सक्रिय असणारां आरोग्य अधिकारी जयदीप त्यांची स्नुषा व उपसरपंच सौ सुशीला वहिनी प्रा. शरद व राजेंद्र ही दादांची आजची मागे असलेली वेगळी ओळख ठरते. प्रतिकूल स्थितीत संत कृपेने व सेवेने चिखलातही कला व भक्तीचे कमळ फुलून येते यावर दृढ विश्वास निर्माण करणारे असे ह भ प बबनदादा पुलाटे यांनी काल देव उठनी एकादशीला देह ठेवला व जगाचा निरोप घेतला . त्यांना परब्रम्ह पांडुरंग कृपेने माऊली ज्ञानोबा व जगतगुरु तुकोबा यांचे आशीर्वादाने परमेश्वर चरणी स्थान लाभो. मंगळवार दि.११ नोव्हेबर २०२५ रोजी होणा-या दशक्रिया विधी निमित्ताने त्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील जी प अध्यक्षा मां. सौ शालिनीताई विखे पाटील प्रवरा आरोग्य परीवार प्रमुख डॉ राजेंद्र विखे पाटील नेतृत्व व कर्तृत्वाने अस्तिव सिद्ध करणारे लाडके युवा नेते डॉ सुजयदादा विखे पाटील दुर्गापूरकर परीवार प्रवरा परीवार व वारकरी भक्त जन परीवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

यशवंत पुलाटे ( जेष्ठ साहीत्यिक तथा संस्थापक प्रवरा शब्दस्नेही व्यासपीठ )

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *