आगामी श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षप्रवेश आणि पक्षांतराचे सत्र शिगेला पोहोचले आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आणि नंतरही अनेक प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षांची अदलाबदल केली आहे, ज्यामुळे काही पक्षांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे, तर काहींना मोठे धक्के बसण्याची चिन्हे आहेत. या पक्षप्रवेशांमुळे पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे ‘इनकमिंग’ आणि ‘आउटगोइंग’ सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे.
उमेदवारीची धाकधूक आणि पक्षांतर्गत गटबाजी
पक्षप्रवेश करणाऱ्या अनेक इच्छुकांना आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा असल्याने त्यांनी आपापल्या प्रभागात कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उमेदवारीबाबत वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१६ च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्षपद गमावले असले तरी, २२ नगरसेवक जिंकून वर्चस्व राखले होते. परंतु, काही दिवसांतच या २२ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवकांनी तत्कालीन नेते ससाणे यांची साथ सोडून नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पाठिंबा दिला होता. यात अंजुम शेख, समिना शेख, ताराचंद रणदिवे, कलीम कुरेशी, शामलिंग शिंदे, हेमलता गुलाटी, राजेश अलघ, प्रकाश ढोकणे, मुक्तार शाह, जयश्री शेळके, निलोफर शेख, सुभाष गांगड यांचा समावेश होता. या सर्वांनी अनुराधा आदिक यांच्यासोबत सात वर्षे काम केले. मात्र, गेल्या वर्षापासून अंजुम शेख यांनी ससाणे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला, तर रवींद्र गुलाटी, हेमलता रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, मुक्तार शाह, कलीम कुरेशी यांनी कानडे यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे.
ससाणे यांच्या समर्थकांची गळती
विधानसभेच्या निवडणुकीनंतर ससाणे यांचे निष्ठावंत मानले जाणारे संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, आशिष धनवटे, संजय गांगड, राजेंद्र आदिक, जयश्री शेळके, मनोज लबडे, शशांक रासकर, कैलास दुबय्या, शामलिंग शिंदे यांच्यासह भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या भारती कांबळे यांनीही काही काळ ससाणे यांना साथ दिली होती. परंतु, आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडून विखे यांच्या गटात प्रवेश केला आहे. ससाणे यांच्या काळात दोन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही ससाणे यांच्याशी फारकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला होता आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.
महाविकास आघाडीतील फाटाफूट आणि नवे समीकरणे
विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे सागर बेग यांनी राजकीय आधार शोधत शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काही महिन्यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घेतली, ज्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ससाणे यांच्यासोबतचे संबंधही दुरावले. एकेकाळी ससाणे यांचे निकटवर्तीय असलेले माजी उपनगराध्यक्ष संजय खल्लारे यांनीही उबाठा शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी उबाठा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
नवीन पक्षप्रवेश आणि बदलती निष्ठा
अलीकडेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनुराधाताई आदिक यांच्यासोबत एकनिष्ठेने काम करणारे राजेंद्र पवार, दीपक चरण चव्हाण, प्रणिती चव्हाण, रईस जहागिरदार, राष्ट्रवादी शहर काँग्रेस फादर बॉडीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, मर्चंटचे संचालक दत्तात्रय धालपे, योगेश जाधव, निलेश बोरावके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ससाणे यांना सहकार्य करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर, रवींद्र गुलाटी, हेमलता रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, गुलशन कंत्रोड, बंटी गुप्ता, नारायणराव डावखर, माजी नगराध्यक्षा इंदुमती डावखर, रोहन डावखर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, माजी नगराध्यक्षा इंदुमती डावखर या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या भगिनी आहेत. मुरकुटे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असताना, आता त्यांची बहीण, मेहुणे आणि भाचा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना तोंड फुटले आहे.
आणखी धक्क्यांची शक्यता
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच काँग्रेसचे काही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. यात तीन माजी नगरसेवकांचा समावेश असून, इतर काही प्रमुख कार्यकर्तेही पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते. या सर्व ‘आउटगोइंग’ आणि ‘इनकमिंग’मुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
सोमवार, १० नोव्हेंबरपासून पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. तोपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण आणि पक्ष बदलांचे सत्र सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे श्रीरामपूरच्या राजकीय भविष्यात मोठे बदल अपेक्षित आहेत.