कोपरगाव । झुंझार न्यूज
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, ‘तिकीट मिळालेच पाहिजे’ या निर्धाराने अनेक जण आपल्या समर्थकांसह नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यात विशेषतः काळे आणि कोल्हे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे.

शक्तीप्रदर्शन आणि ‘आर्थिक’ बळाचा वापर
इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचारयंत्रणा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि ‘आर्थिक’ बळ यांचा वापर करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी मिळवणे हेच मोठे आव्हान बनले आहे.

दिग्गजांची भूमिका गुलदस्त्यात
राज्याच्या राजकारणात काळे आणि कोल्हे हे सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते असले तरी, कोपरगावात नेहमीच गटतटाचे राजकारण दिसून येते. येथे व्यक्तीकेंद्रीत राजकारण अधिक प्रभावी असल्याने प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची ठरते. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि परजणे गट यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे, ज्यामुळे राजकीय समीकरणात अनिश्चितता कायम आहे.

उबाठा सेनेचे माजी नगरसेवक साखरसम्राटांच्या आश्रयाला?
राजकीय वर्तुळात सध्या एक नवी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे उबाठा सेनेचे काही माजी नगरसेवक साखरसम्राटांच्या आधिपत्याखाली जाण्यास तयार असल्याची. यामुळे कोपरगावच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला आरक्षणामुळे ‘सौभाग्यवती’ मैदानात
महिला आरक्षणामुळे अनेक इच्छुकांना नगरसेवकपदाची इच्छा सोडून द्यावी लागली आहे. यामुळे अनेकांनी आता स्वतः ऐवजी आपल्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे काही प्रभागात ‘सौभाग्यवतींचा’ प्रचार जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.

नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक
काळे-कोल्हे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची चर्चा असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, पराग संधान, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, दीपक वाजे, योगेश बागुल, मंदार पहाडे, सुनील गंगुले, दिनार कुदळे यांच्यासह राजेंद्र झावरे आणि विजय वहाडणे हे देखील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

कोयटे पिता-पुत्रांचा माघारीचा निर्णय
नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची तयारी करणारे काका कोयटे आणि पुत्र संदीप कोयटे यांनी अचानकपणे माघार घेतली आहे. त्यांनी ‘आपण बरे आणि आपली पतसंस्था बरी’ अशी भूमिका घेत निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांनी ‘ओरिजनल ओबीसी’लाच नगराध्यक्षपदाची संधी मिळावी अशी मागणी केली आहे.

कोल्हे गटासोबत युती निश्चित
माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल आणि अतुल काळे यांनी कोल्हे गटासोबत आपली युती पक्की असल्याचे सांगितले आहे. कोल्हे गटाने त्यांना आठ जागा दिल्या असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी कोपरगावातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे.
