शिर्डी । झुंझार न्यूज

शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, राजकीय वातावरण तापले आहे. एकूण ११ अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले आहेत, तर विविध प्रभागांमधून नगरसेवकपदासाठीही मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी चुरस

नगराध्यक्षपदाची जागा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने या जागेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महायुतीकडून जयश्रीताई विष्णू थोरात यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे. काँग्रेस पक्षाकडून माधुरीताई अविनाश शेजवळ यांनी अर्ज भरला आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून भाग्यश्री सुयोग सावकारी यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. याशिवाय, तिसरी आघाडी म्हणून पुरोहित गटाकडून कल्याणी विठ्ठल आरणे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.

 

प्रभागनिहाय अर्ज स्थिती

नगरसेवकपदासाठी प्रत्येक प्रभागात जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. प्रभागनिहाय अर्ज स्थिती खालीलप्रमाणे:
प्रभाग १-अ: अनुसूचित जाती महिला – २ अर्ज
प्रभाग १-ब: सर्वसाधारण – ७ अर्ज
प्रभाग २-अ: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – ८ अर्ज
प्रभाग २-ब: सर्वसाधारण महिला – ५ अर्ज
प्रभाग ३-अ: अनुसूचित जाती – १० अर्ज
प्रभाग ३-ब: सर्वसाधारण महिला – २ अर्ज
प्रभाग ४-अ: अनुसूचित जमाती महिला – ३ अर्ज
प्रभाग ४-ब: सर्वसाधारण – ७ अर्ज
प्रभाग ५-अ: अनुसूचित जाती महिला – ५ अर्ज
प्रभाग ५-ब: सर्वसाधारण – ५ अर्ज
प्रभाग ६-अ: अनुसूचित जाती – ८ अर्ज
प्रभाग ६-ब: सर्वसाधारण महिला – ७ अर्ज
प्रभाग ७-अ: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला – ४ अर्ज
प्रभाग ७-ब: सर्वसाधारण – ५ अर्ज
प्रभाग ८-अ: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – ८ अर्ज
प्रभाग ८-ब: सर्वसाधारण महिला – ५ अर्ज
प्रभाग ९-अ: अनुसूचित जाती महिला – २ अर्ज
प्रभाग ९-ब: सर्वसाधारण – ६ अर्ज
प्रभाग १०-अ: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला – ४ अर्ज
प्रभाग १०-ब: सर्वसाधारण – १० अर्ज
प्रभाग ११-अ: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला – ६ अर्ज
प्रभाग ११-ब: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – ६ अर्ज
प्रभाग ११-क: सर्वसाधारण महिला – ७ अर्ज

 

 

महाविकास आघाडीत बिघाडी

 

 

शिर्डीत महाविकास आघाडी एकत्र येऊन महायुतीला आव्हान देईल अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) गटाने स्वतंत्रपणे नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी अर्ज भरल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे महायुतीसमोर आता एकसंध आघाडीऐवजी विविध पक्षांचे आव्हान उभे ठाकले आहे. पुरोहित गटानेही स्वतंत्रपणे अर्ज भरल्याने निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

 

 

राजकीय पक्षांचे बलाबल

महायुती : भाजपा: १ नगराध्यक्ष, १६ नगरसेवक
शिवसेना (शिंदे गट): ४ नगरसेवक
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ३ नगरसेवक

महाविकास आघाडी व इतर : काँग्रेस : १ नगराध्यक्ष, १२ नगरसेवक , शिवसेना : (उबाठा): १ नगराध्यक्ष, ८ नगरसेवक , पुरोहित गट: १ नगराध्यक्ष, १३ नगरसेवक

 

प्रतिक्रिया

प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते म्हणाले की , आम्ही ना. राधाकृष्ण विखे आणि डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या सर्वांना एकत्र घेऊन महायुती शिर्डीच्या विकासाचा अजेंडा लोकांसमोर ठेवणार आहे. झालेले विकास आणि होणारा विकास लोकांसमोर मांडून महायुती शंभर टक्के सत्ता स्थापन करेल. ‘२३ झिरो’चा नारा तीन तारखेला प्रत्यक्षात दिसेल. मार्गदर्शक म्हणून मी थांबून घेतले आहे, विखे पाटील यांनी कोणताही निर्णय माझ्यावर लादलेला नाही. समोरच्या पार्टीचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्यातील कोणीही नाराज नाही.

शिर्डी कॉग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले म्हणाले की , आम्ही आघाडीतील सर्व मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत. एकमत झाल्यास महाविकास आघाडीमार्फत निवडणूक लढवू, अन्यथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीचे वातावरण दहशतीखाली येण्याची शक्यताही आहे. छोट्या निवडणुका लोकांनी स्वतःहून निर्णय घेऊन लढवाव्यात, बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहू नये.

माजी उपनगराध्य अभय शेळके म्हणाले की , महायुतीच्या वतीने नगराध्यक्षपदासह एकूण २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीचा चेहरामोहरा विकासात्मक दृष्टीने बदलून टाकू. आगामी महाकुंभमेळ्यामुळे शिर्डीला महत्त्व येणार आहे आणि शिर्डीचे मतदार सुज्ञ असल्याने विकासात्मक दृष्टिकोनातून महायुतीलाच विजय मिळवून देतील.

भाजपा शिर्डी शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर म्हणाले की , ही निवडणूक खऱ्या अर्थाने विकासात्मक झालेल्या कामांच्या पावतीवर होणार आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल. जागावाटपाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीला ३, शिवसेनेला ४ आणि भाजपला १६ नगरसेवकपदांसह नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली असून, हा निर्णय सर्व सन्मानपूर्वक घेण्यात आला आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिर्डी नगर परिषदेसमोर अक्षरशः लोकशाहीचा मेळावा भरल्याचे चित्र होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आता उमेदवारी अर्ज छाननी आणि माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *