लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घेतले श्री खंडोबाचे दर्शन

संगमनेर । झुंझार न्यूज

संपूर्ण महाराष्ट्रात चंपाषष्ठीचा उत्साह असताना, संगमनेर शहरातही या सणाचे मोठे औचित्य साधत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. चंपाषष्ठीच्या पावन निमित्ताने संगमनेर शहरातील तेलीखुंट येथे ‘मित्र प्रेम तरुण मंडळ’ (होलम भक्त) यांच्या वतीने भव्य भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावून श्री खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतले.

तेलीखुंट येथील मित्र प्रेम तरुण मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने आयोजित महाप्रसाद आणि भंडारा कार्यक्रमासाठी बाळासाहेब थोरात यांनी विशेष वेळ देऊन हजेरी लावली. यावेळी त्यांनी कुलदैवत श्री खंडेराया चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

दर्शनानंतर थोरात यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि उपस्थित भाविकांची आत्मीयतेने भेट घेतली. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी सर्वांना चंपाषष्ठीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 

आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणाले की, “श्री खंडोबाच्या कृपेने संगमनेरकरांसह सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलकार्याची भरभराट नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”


यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मित्र प्रेम तरुण मंडळाच्या (होलम भक्त) वतीने आयोजित या शिस्तबद्ध आणि सात्विक कार्यक्रमाचे बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *