डॉ. मैथिली तांबेसह सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड समोर आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) ने संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत ‘सेवा समिती’च्या उमेदवारांना आपला बिनशर्त आणि जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या निर्णयामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली सत्यजित तांबे आणि सेवा समितीच्या पॅनलची ताकद अधिक वाढली आहे.

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने पक्षाचे अहमदनगर जिल्हाप्रमुख सुधाकरराव रोहम आणि तालुकाप्रमुख ॲड. रमेश बनसोडे यांनी नुकतेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि युवा नेते सत्यजित तांबे यांची भेट घेतली. यावेळी संगमनेर नगरपरिषदेसाठी उभ्या असलेल्या सेवा समितीच्या उमेदवारांना पक्षाचा पाठिंबा असल्याचे अधिकृत पत्र सत्यजित तांबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

 

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुधाकरराव रोहम यांनी सांगितले की, “रिपाई (गवई गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर शहराच्या विकासासाठी आणि सर्वसमावेशक नेतृत्वासाठी रिपाई गवई पक्ष संगमनेर तालुक्यातील सेवा समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.

 

पक्षातर्फे देण्यात आलेल्या पाठिंब्यामध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांच्यासह नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सर्व ३० उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाचा हा पाठिंबा केवळ कागदावर नसून, तमाम बौद्ध समाज आणि रिपाईचे कार्यकर्ते सेवा समितीच्या विजयासाठी सक्रिय होतील, असा विश्वास रोहम यांनी व्यक्त केला.

या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील हॉटेल अंबर येथे रिपब्लिकन पक्ष (गवई गट) च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष ॲड. रमेश बनसोडे होते. बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली असून, पक्षाचे सर्व शाखाप्रमुख, शहराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच प्रचाराच्या कामाला सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. सेवा समितीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीसाठी आणि पाठिंबा जाहीर करताना शहर प्रमुख राजाभाऊ अहिरे, महिला आघाडी प्रमुख रमाताई तपासे, ज्येष्ठ नेते सुरेश देठे, राजेंद्र घायवट, तुकाराम जाधव, अशोक गायकवाड, पेंटर गायकवाड, गोरक्षनाथ बनसोडे, सोमनाथ खरात, बाळासाहेब नाना गायकवाड, साहेबराव यादव, दादू यादव, जालिंदर बोरुडे, उत्तम बनसोडे यांच्यासह संगमनेर शहरातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *