लाख पढेगाव येथे आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीने ‘संविधान सन्मान परिषद’ मोठ्या उत्साहात संपन्न

श्रीरामपूर । झुंझार न्यूज

भारताचे संविधान ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली एक अनमोल देणगी असून, संविधानामुळेच देशात समता, न्याय आणि बंधुता टिकून आहे. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाच्या मताची किंमत संविधानामुळेच समान झाली आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे आणि ते घरोघरी पोहचवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंत सेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख (अहिल्यानगर) आणि कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सुभाषराव हळनोर यांनी केले.

 

आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीने श्रीरामपूर तालुक्यातील लाख पढेगाव येथे शनिवारी (दि. २९) भव्य ‘संविधान सन्मान परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.


या परिषदेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष मा. मधुकर साळवे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा. रेवन्नाथ जाधव, एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. अनिलजी जाधव, एकलव्य भिल्ल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजी गांगुर्डे, आदिवासी बचाव समितीचे संस्थापक मा. कैलास माळी, तर स्वागताध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे उपसभापती मा. बाळासाहेब तोरणे आणि सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ खेमनर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके नियोजन आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर बंगड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. सुभाषराव हळनोर म्हणाले की, १५० वर्षांच्या परकीय गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस अथक परिश्रम घेऊन देशाची घटना लिहिली. संविधानाने गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी दूर केली असून, सर्वसामान्यांना सर्वोच्च पदावर बसण्याचा अधिकार दिला आहे. भारतीय तिरंग्यातील तीन रंग आणि अशोक चक्र हे देशाच्या एकात्मतेचे आणि गतीमानतेचे प्रतीक आहे.

ते पुढे म्हणाले की, आज काही लोकांकडून संविधानाला धोका निर्माण झाला आहे का, अशी भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत संविधानाचे पावित्र्य टिकवणे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून तो आपला धर्मग्रंथ आहे.


यावेळी बोलताना त्यांनी, “रुतबा हर इन्सान को संविधान से मिला है, तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है, औरों को जो मिला वह मुक्कद्दर से मिला है, हमे तो मुक्कद्दर से ही संविधान मिला है!” या काव्यपंक्तींतून संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.


या परिषदेसाठी लाख पढेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिक, आदिवासी बांधव, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बंगड यांनी मानले.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *