शिर्डीत ना आरोप, ना प्रत्यारोप; ‘शोले’ स्टाईलने प्रचाराचा समारोप
शिर्डी । झुंझार न्यूज
कोणतीही निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, सभांमधील शाब्दिक चकमकी आणि गोंगाट हे समीकरण ठरलेले असते. मात्र, शिर्डी नगरपरिषदेची निवडणूक याला मोठा अपवाद ठरली आहे. शिर्डीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत शांततामय आणि दबक्या आवाजात प्रचार यंत्रणा राबवली गेली. ही शांतता एखाद्या नियोजित रणनीतीचा भाग असल्यासारखी भासत असून, शोले चित्रपटातील ‘बेटा सोजा, नही तो गब्बर आयेगा’ या संवादाप्रमाणे, एका विशिष्ट धाकाखाली किंवा अदृश्य दरार्यामुळे प्रचारात ही नीरव शांतता अनुभवयास मिळाली. अशा ‘शोले स्टाईल’ वातावरणात शिर्डीच्या प्रचाराचा समारोप झाला आहे.
विखेंचा ‘सस्पेन्स’ आणि विरोधकांची कोंडी
निवडणूक आचारसंहिता लागू होताच शिर्डीत अनेकांनी बाशिंगे बांधली होती. मात्र, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी आणि रणनीतीबाबत जो ‘सस्पेन्स’ सुरुवातीपासून कायम ठेवला, तो शेवटपर्यंत विरोधकांना उलगडलाच नाही. सुरुवातीला महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष एकत्र येत विखेंच्या महायुतीला कडवे आव्हान देतील, अशी चिन्हे होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात चर्चाही झाली, थोरातांनी एकजुटीचा कानमंत्रही दिला. मात्र, आघाडी होण्याऐवजी ‘बिघाडी’च जास्त झाली.
बाबुराव पुरोहित यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा करत रणशिंग फुंकले खरे, पण विखे पाटलांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राखलेला सस्पेन्स विरोधकांना घायाळ करणारा ठरला. ऐनवेळी डॉ. विखे यांनी सुकाणू समितीचा निर्णय स्वतःच्या हाती घेत बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जयश्री थोरात यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित केली. या अनपेक्षित चालीमुळे दादांच्या (अजित पवार गट/महायुती) तिकिटावर डोळा ठेवून असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांना विरोधी गोटात जाण्यासाठी किंवा बंडखोरी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही. परिणामी, विरोधकांमध्ये एकवाक्यता न होता काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि पुरोहित गट स्वतंत्ररीत्या रिंगणात उतरले.
थोरात शिर्डीपासून दूरच!
शिर्डीच्या गडात विखेंना घेरण्यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मोठी ताकद लावतील, जंगी सभा घेतील आणि विखेंवर शरसंधान साधतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, थोरात यांनी सुरुवातीला एक धावती भेट दिली, त्यानंतर ते शिर्डीकडे फिरकलेच नाहीत. थोरातांनी या निवडणुकीपासून जाणीवपूर्वक दूर राहणे पसंत केल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून आला.
विखे पिता-पुत्र ‘फुल ॲक्टिव्ह’
एकीकडे थोरात अलिप्त असताना, दुसरीकडे ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली. “निवडणूक हलक्यात घ्यायची नाही,” असा पवित्रा घेत विखे पिता-पुत्रांनी स्वतः प्रत्येक प्रभागात कॉर्नर सभा घेतल्या. कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता त्यांनी प्रचार यंत्रणा हायटेक आणि वेगवान केली.
अपक्षांच्या मागे ‘अदृश्य शक्ती’ कोणाची?
या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या पाठीशी असलेली कथित ‘अदृश्य शक्ती’. अनेक अपक्ष उमेदवार प्रचार करताना चक्क विखे पाटलांचा फोटो वापरून मते मागत आहेत आणि मतदारही त्याला प्रतिसाद देत आहेत. “आमच्या मागे एका अदृश्य शक्तीचा हात आहे,” असे हे उमेदवार खाजगीत सांगत आहेत. आता ही अदृश्य शक्ती नेमकी विखेंची आहे की थोरातांची? हे न उलगडणारे कोडे असले तरी, १ डिसेंबरला मतदानातून बाहेर पडणारा ‘अदृश्य हात’ कोणाचे बाजार उठवणार आणि कोणाला तारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.