शहरात भाजपा-महायुतीच्या उमेदवारांसाठी नामदार विखे पाटील यांचा झंझावाती प्रचार दौरा; महिलांकडून ठिकठिकाणी औक्षण

श्रीरामपूर । झुंझार न्यूज

श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेतला असून, भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील स्वतः मैदानात उतरले आहेत. नामदार विखे पाटील यांनी श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांमध्ये झंझावाती दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

 

उस्फूर्त स्वागत आणि जनसंवाद

नामदार विखे पाटील यांच्या या प्रचार दौऱ्याला श्रीरामपूरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरत असताना त्यांनी आबालवृद्धांशी, व्यापाऱ्यांशी आणि महिला भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या आणि अपेक्षा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. विकासाच्या मुद्द्यावर आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी विखे पाटील यांनी दिली.

ठिकठिकाणी औक्षण

प्रचार दौऱ्यादरम्यान नामदार विखे पाटील यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, अनेक प्रभागांमध्ये महिलांनी पुढाकार घेत पालकमंत्र्यांचे आणि उमेदवारांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. फुलांच्या वर्षावात आणि जयघोषाच्या घोषणांमध्ये हा प्रचार दौरा पार पडला. या स्वागतामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

नामदार विखे पाटील यांचे आवाहन

मतदारांशी संवाद साधताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, “श्रीरामपूर शहराचा विकास खुंटला असून, शहराला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी नगरपरिषदेत भाजपा-महायुतीची सत्ता येणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शहरासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शहराचा कायापालट करण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी मतदारांनी भाजपा-महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.

यावेळी भाजपा आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार दौऱ्यामुळे श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *