‘आपले गाव’ वाचवण्यासाठी संगमनेरकर एकवटले; प्रचाराची सांगता अभूतपूर्व उत्साहात

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची सांगता आज एका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व रॅलीने झाली. ‘आपले गाव’ संगमनेरसाठी सेवा समितीने आयोजित केलेल्या या महाविसाच्या रॅलीमध्ये तब्बल १५ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवत विरोधकांना धडकी भरवणारे शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीमुळे संगमनेर मधील मेन रोड, बाजारपेठ आणि बस स्थानकासह संपूर्ण परिसर सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि घोषणांनी गजबजून गेला होता.

जाणता राजा मैदान येथून या विशाल रॅलीची सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रभागी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे आणि रणजितसिंह देशमुख , मनीष मालपाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जाणता राजा मैदानावरून सुरू झालेली ही रॅली संगमनेर बसस्थानक, मेन रोड आणि बाजारपेठमार्गे शहराच्या मुख्य भागातून मार्गस्थ झाली.

 

तरुणाई आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

या रॅलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे संगमनेर शहरातील तरुण आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती. हाती सेवा समितीचे चिन्ह असलेल्या ‘सिंहा’चे फोटो आणि चेहऱ्यावर प्रचंड उत्साह घेऊन हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. रॅलीदरम्यान लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

 

“पाणी पळवण्यासाठी विरोधकांना नगरपालिका हवी” – आ. सत्यजित तांबे

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “बाहेरील लोकांचा संगमनेरच्या प्रगतीवर डोळा आहे. येथील काही फुटीर लोकांना हाताशी धरून ते संगमनेरचा विकास मोडू पाहत आहेत. आधी आमची रेल्वे पळवली आणि आता संगमनेर शहराचे पाणी पळवण्याचा त्यांचा डाव आहे. हे पाणी मिळवण्यासाठी त्यांना नगरपालिकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ हवे आहे, आणि केवळ त्यासाठीच त्यांना नगरपालिका ताब्यात घ्यायची आहे.”

 

 

पुढे बोलताना ते म्हणाले, “विकास करण्याची धमक फक्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, बाकीचे फक्त ओरबाडण्यात व्यस्त आहेत. गेल्या वर्षभरापासून शहराची शांतता भंग झाली आहे. आता संगमनेरकर आपल्या गावासाठी आणि शहरासाठी एकवटले आहेत. सेवा समिती पुढील पाच वर्षांचे विकासाचे व्हिजन घेऊन काटेकोरपणे काम करेल.”

 

 

अभूतपूर्व उत्साह आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीने या निवडणुकीची सांगता संस्मरणीय ठरली.

 

एकीकडे सेवा समितीच्या रॅलीला जनसागर लोटला असताना, दुसरीकडे शिंदे सेनेच्या वतीने आयोजित केलेली रॅली पूर्णपणे अयशस्वी ठरली. ढोल-ताशांची चार पथके घेऊन सुरू झालेल्या या रॅलीत स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला नाही. गर्दी जमवण्यासाठी ग्रामीण भागातून काही युवकांना आणण्यात आले होते, मात्र त्यांनीही काढता पाय घेतल्याने रॅली निस्तेज झाली. गर्दी नसल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना रॅली अर्ध्यावरच सोडून माघारी फिरावे लागले. इतकेच नव्हे, तर नवीन नगर रोड येथे आयोजित केलेली सांगता सभा देखील रद्द करण्याची वेळ आली .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *