नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
नागपूर । झुंझार न्यूज
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महायुती सरकार या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून, महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने नागपूर येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ९ गावांमधील अकारी पडीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडली. मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सविस्तर समजून घेत सकारात्मक चर्चा केली.

यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “अकारी पडीत प्रश्नासंदर्भात यापूर्वीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवणे ही महायुती सरकारची ठाम भूमिका आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर यापूर्वीच चर्चा झाली असून, काही निर्णय घेतले गेले आहेत.

पुढील कार्यवाहीबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच मुंबईत जाऊन राजभवनावर राज्यपाल महोदयांची भेट घेतली जाईल. त्यांच्याशी चर्चा करून प्रलंबित निर्णयांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, ॲड. अजित काळे, चळवळीचे याचिकाकर्ते गिरीधर आसने, भाजपचे दीपक पटारे यांच्यासह ९ गावांमधील शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये सचिन वेताळ, गोविंद वाघ, सुनील आसने, संतोष मुठे, चंद्रकांत खरे, बाळासाहेब वेताळ, गोरखनाथ वेताळ, बापुसाहेब गोरे, बबनराव नाईक, प्रशांत शिंदे, आदिनाथ दिघे, सोमनाथ रूपटक्के, दादासाहेब रूपटक्के, राजेंद्र गोसावी, अक्षय मुठे, सुभाष गाडेकर, अमोल गुळवे, गंगाधर वेताळ आणि दत्तात्रय भालेराव आदी २५ हून अधिक शेतकऱ्यांचा समावेश होता.

