{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

अकोले । झुंजार न्यूज

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, ज्यांनी आपल्या कृतीने, त्यागाने आणि निष्ठेने जनमानसात अढळ स्थान निर्माण केले आहे. अशाच दुर्मिळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपाध्यक्ष विजयराव गोविंद वाकचौरे उर्फ लाडके ‘विजूभाऊ’. आज वयाची ६९ वर्षे पूर्ण करून ७० व्या वर्षात (अमृत महोत्सवी वर्षात) पदार्पण करत असताना, त्यांच्या या देदिप्यमान प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

 

१२/१२: जन्मतारखेचा अनोखा योग

महाराष्ट्राच्या राजकारणात १२ डिसेंबर (12/12) या तारखेला एक वेगळेच महत्त्व आहे. राजकारणातील भीष्मपितामह शरदराव पवार, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे आणि गोरगरिबांचे कैवारी विजयराव वाकचौरे या तिघांची जन्मतारीख एकच आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे, या तिन्ही नेत्यांनी आपापल्या परीने जनमानसात राहून, लोकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम केले आहे. शरद पवारांची मुत्सद्देगिरी आणि गोपीनाथ मुंडेंचा लोकसंग्रह ज्याप्रमाणे वाखाणला जातो, त्याचप्रमाणे विजयराव वाकचौरे यांचा ‘त्याग आणि निष्ठा’ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.

 

पँथरच्या मुशीतून घडलेले आक्रमक नेतृत्व

 

अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील अकोले या आदिवासी पट्ट्यातील सुगाव सारख्या ग्रामीण भागात विजयरावांचा जन्म झाला. त्यांच्यावर लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार झाले. त्यांना सामाजिक कार्याचे बाळकडू हे ‘दलित पँथर’च्या चळवळीतून मिळाले. भाई संगारे, राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांसारख्या आग्यामोहोळ नेत्यांच्या सानिध्यात राहून विजूभाऊंनी सामाजिक क्रांतीचे धडे गिरवले. केवळ भाषणे न देता, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी, समाजाच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले आणि उपोषणे केली. दलित पँथर चळवळीतून तयार झालेला हा कार्यकर्ता पुढे रिपब्लिकन चळवळीचा एक मजबूत स्तंभ बनला.

 

रामदास आठवलेंची सावली आणि निष्ठेचा प्रवास

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून विजयरावांनी काम केले. पँथर चळवळ ते रिपब्लिकन पक्ष हा प्रवास करताना पक्षाला गगनभरारी देण्यात विजूभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, खेडोपाड्यात पक्ष पोहोचवण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले. रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी कधीही पदाचा मोह धरला नाही. मिळेल त्या पदावर आपल्या कामाचा ठसा उमटवला. आज ते रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत, हे त्यांच्या अविरत कष्टाचे फळ आहे.

 

आमदारकीची हुलकवणी आणि राजकीय षडयंत्र

विजयराव वाकचौरे यांचा स्वभाव हसमुख, प्रेमळ असला तरी अन्यायाविरुद्ध ते तितकेच आक्रमक आहेत. मात्र, त्यांच्या या सरळमार्गी आणि स्पष्टवक्तेपणाचा फटका त्यांना राजकारणात बसला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एक प्रसंग असा आला की, राज्यपाल कोट्यातून त्यांची आमदारकी निश्चित मानली जात होती. मात्र, अकोले तालुक्यात आपले राजकीय वर्चस्व अबाधित राहावे आणि विजूभाऊंसारखा तगडा स्पर्धक नको, या हेतूने ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या मध्यस्तीने हालचाली केल्या. रामदास आठवले आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करून ऐनवेळी विजूभाऊंचा पत्ता कट करण्यात आला. हा राजकीय दगाफटका आजही त्यांच्या मनात खोलवर रुतलेला आहे, परंतु पक्षाच्या आदेशाचा मान राखत त्यांनी हा निर्णय पचवला आणि पुन्हा जोमाने कामाला लागले. हीच त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यागवृत्ती दर्शवते.

 

बहुआयामी व्यक्तिमत्त्व

विजूभाऊ केवळ राजकारणी नाहीत, तर ते एक रसिक वाचक आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व आहेत. अनेक साहित्यिक आणि विचारवंतांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात केलेले काम इतके अफाट आहे की, त्यावर ‘मी घडलो’ यांसारखे एखादे पुस्तक लिहिले तरी ते कमीच पडेल. त्यांचा हा संघर्षमय जीवनप्रवास आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

 

आज त्यांच्या ७० व्या वर्षात पदार्पण करत असताना, तमाम कार्यकर्त्यांच्या मनात एकच भावना आहे की, “विजूभाऊंसारख्या त्यागवृत्तीच्या नेत्याला आता तरी खऱ्या अर्थाने न्याय मिळावा.” ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याला मोठे करण्यासाठी स्वतःच्या संधी नाकारल्या, त्या विजयरावांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे.

संपूर्ण अहिल्यानगर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम रिपब्लिकन जनसागराकडून, विजयराव गोविंद वाकचौरे यांना उदंड आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

राजेश गायकवाड ( पत्रकार )

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *