{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

घुलेवाडी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्याचे ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या संगमनेर पंचायत समितीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार असून, राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यात ‘काटे की टक्कर’ होणार आहे. विशेष म्हणजे, अलीकडील पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी स्वतः निवडणुकीची सूत्रे हाती घेतली असून, ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

थोरातांची ‘सावध’ पावले; गावोगावी जनसंपर्क

नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार आत्मचिंतन सुरू केले आहे. पूर्वीप्रमाणे केवळ कार्यकर्त्यांच्या भरवशावर न राहता, त्यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. थोरात यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका न घेता, स्वतः गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत, झालेल्या चुका सुधारण्यावर त्यांचा भर आहे. आगामी नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पंचायत समितीची सत्ता अबाधित राखण्यासाठी त्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

घुलेवाडी गण ठरणार ‘किंगमेकर’

या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आणि उत्कंठा ‘घुलेवाडी’ गणाची आहे. हा गण अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव असून, येथून निवडून येणारा उमेदवारच संगमनेर पंचायत समितीचा ‘भावी सभापती’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

घुलेवाडी परिसरावर बाळासाहेब थोरात यांचे मोठे वर्चस्व मानले जाते. संगमनेर साखर कारखाना, दूध संघ, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, डेंटल कॉलेज यांसारख्या प्रमुख संस्था आणि उद्योगधंदे या भागात असल्याने येथे कामगार वर्ग मोठ्या संख्येने आहे. हा वर्ग थोरातांचा पारंपारिक मतदार मानला जातो. त्यामुळे या गणात थोरात गटाचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

 

इच्छुकांची गर्दी आणि लॉबिंग

सभापतीपद मिळण्याच्या शक्यतेमुळे दोन्ही गटांतून उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
थोरात गट: बाळासाहेब थोरात यांच्या गोटातून ॲड. रमेश बनसोडे, राजू खरात, शिवाजी दुशिंग , रामदास भालेराव आणि संतोष आव्हाड यांसारख्या तगड्या उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.

महायुती (विखे-खताळ गट): दुसरीकडे, महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर भाऊ वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुरेश रूपवते आणि रिपाईकडून आशिष शेळके यांच्या नावाची चर्चा असून प्रशांत निकम या तरुणांनी ही आपली अपक्ष म्हणून तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे यांच्या व्यक्तीरिक्त अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे .

 

सध्या हे सर्वच इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत असून, विविध कार्यक्रमांना हजेरी लावत “आम्हीच भावी सभापती” असल्याचे सांगत आहेत. आता श्रेष्ठी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीचा ‘विकासकामांवर’ भर

एकीकडे थोरात आपल्या गडाचे रक्षण करण्यासाठी सरसावले आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे नेते विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीकडून ‘लाडकी बहीण योजना’, शेतकरी कर्जमुक्ती, बेरोजगारांचे प्रश्न, निळवंडे धरणाचे पाणी आणि भोजापूर चारीचा प्रश्न यांसारख्या विकासकामांवर भर दिला जात आहे. सरकारी योजनांचा लाभ आणि विकासाचे आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.

सत्तेचे गणित आणि भूतकाळ

मागील पंचवार्षिक निवडणुकीचा विचार करता, संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व होते. जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ८ गट आणि पंचायत समितीच्या १८ पैकी तब्बल १६ गणांवर थोरात गटाने विजय मिळवला होता. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणात आणि नुकत्याच झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर, हे वर्चस्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान थोरातांसमोर असणार आहे.

संगमनेर पंचायत समितीचे ‘मिनी मंत्रालय’ कोणाच्या ताब्यात जाणार? थोरातांचा गड शाबूत राहणार की विखे-खताळ युती भगवा फडकवणार? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी संगमनेरच्या चौकाचौकात सध्या राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ जोरात सुरू आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *