पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न
शिर्डी । झुंझार न्यूज
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आणि इंटरनॅशनल ॲचिव्हर्स अवाॅर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे ‘पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘साई युग न्यूज’चे संपादक भगवान थोरात यांची ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघा’च्या राहाता तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

शिर्डी येथे आयोजित या विशेष सोहळ्यात ‘दर्पण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात भगवान थोरात यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन संघटनेच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे , श्री साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी माननीय श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत थोरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

संघटना वाढीसाठी कटीबद्ध – भगवान थोरात
आपल्या नियुक्तीला उत्तर देताना भगवान थोरात म्हणाले की, “संघाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आगामी काळात राहाता तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पत्रकार संघटनेची व्याप्ती वाढवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. पत्रकारांच्या हितासाठी संघटनात्मक ताकद उभी करणे हे माझे मुख्य ध्येय असेल.
या सोहळ्याला शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, स्टार इंडिया सौंदर्य स्पर्धेतील विजेती प्रिया चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, संघाचे जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ पगार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पत्रकार सुरेश मुळे, वाल्मीक बावचे, गणेश भालेराव, राहुल कोळगे, रवींद्र जगताप, विनोद जवरे यांसह पत्रकार क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
भगवान थोरात यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींकडून आनंद व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


