२० जानेवारी २०२६ ला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

.
लोणी खुर्द । झुंझार न्यूज

राहाता तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या लोणी खुर्द येथील श्री वरदविनायक सेवाधाम येथे १३ व्या गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ ते शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत हा भव्य महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी दिली आहे.

या उत्सवाचे औपचारिक उद्घाटन आणि ध्वजारोहण राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र विखे पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. या निमित्ताने लोणी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

उत्सवाच्या काळात दररोज सकाळी आणि सायंकाळी नामवंत कीर्तनकारांच्या प्रबोधनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. कीर्तनाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल:

मंगळवार, २० जानेवारी: सकाळी १० वाजता ह.भ.प. बाबा महाराज मोरे, तर सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. राम महाराज बोचरे यांचे कीर्तन होईल.

बुधवार, २१ जानेवारी: सकाळी ह.भ.प. भारत महाराज धावणे आणि सायंकाळी भाषाप्रभू ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन रंगणार आहे.गुरुवार,

२२ जानेवारी: सकाळी ह.भ.प. अंकुश महाराज जगताप आणि सायंकाळी वारकरी भूषण ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी आपल्या वाणीतून प्रबोधन करतील.

शुक्रवार, २३ जानेवारी: सकाळी मृदंग महर्षी ह.भ.प. युवराज महाराज देशमुख यांचे कीर्तन होईल, तर सायंकाळी महोत्सवाची सांगता ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या ‘काल्याच्या कीर्तनाने’ होईल.


तालुक्यातील गावांकडून ‘आमटी-भाकरी’चा महाप्रसाद
या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्व गावांच्या वतीने सामूहिक रित्या ‘आमटी-भाकरी’चा महाप्रसाद भाविकांना देण्यात येणार आहे. ग्रामीण संस्कृती आणि सेवाभाव जोपासणारा हा महाप्रसाद या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

तरी या चार दिवसीय गणेश जयंती महोत्सवात राहाता तालुक्यातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज आणि श्री वरदविनायक सेवाधाम ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *