कत्तलखान्यापासून वाचवलेल्या गोवंशाची निस्वार्थ सेवा

 

 

दररोज ५ टन चाऱ्याची गरज, दानशूरांच्या मदतीवर डोलारा

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील मांची येथील ‘उज्ज्वल गोरक्षक केंद्र’ सध्या संपूर्ण परिसरात पशुसेवेचे एक उत्तम उदाहरण बनले आहे. जिथे आजच्या काळात पशुपालनाकडे केवळ व्यवसायाच्या दृष्टीने पाहिले जाते, तिथे गेल्या २० वर्षांपासून हे केंद्र कोणत्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता ४०० हून अधिक देशी गायींचे अत्यंत जिव्हाळ्याने संगोपन करत आहे.

या केंद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कत्तलखान्याकडे जाण्यापासून वाचवलेल्या जनावरांना आश्रय दिला जातो. विशेष म्हणजे, या गायींचा कुठलाही दुग्धव्यवसाय केला जात नाही. गायींचे दूध काढले जात नाही, तर ते पूर्णपणे त्यांच्या लहान वासरांना पाजले जाते. केवळ गोवंश रक्षण आणि सेवा हाच या संस्थेचा मुख्य उद्देश असून, सामाजिक कार्यकर्ते सुमतीलाल गांधी यांनी यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे.

४०० जनावरांच्या चारा आणि आरोग्याची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान आहे. या केंद्रात दररोज ४ ते ५ टन चारा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने गिनी गवत, मका आणि ऊस यांचा समावेश असतो. संस्थेचा दैनंदिन खर्च २० ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान असून हा सर्व खर्च देणगीदारांकडून मिळणाऱ्या मदतीतून केला जातो. जनावरांच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी दररोज तपासणी करतात, तर गंभीर आजारांसाठी बाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केले जाते. केंद्रात ७ ते ८ कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत.

पूर्वी या संस्थेतून गरजू शेतकऱ्यांना सुदृढ वासरे आणि गायी पाळण्यासाठी दिल्या जात होत्या. मात्र, काही ठिकाणी या जनावरांचा दुरुपयोग होत असल्याचे आणि त्यांची नीट काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुमतीलाल गांधी यांनी आता कोणालाही जनावरे न देण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर, चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून गांधी आपल्या स्वतःच्या शेतातूनही चाऱ्याची उपलब्धता करून देतात.

 

हे केंद्र शाळीग्राम होडगर यांनी दान दिलेल्या साडेतीन एकर खडकाळ माळरानावरील जमिनीवर वसलेले आहे. मारवाडी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने येथे भव्य शेड उभारण्यात आले आहेत. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या केंद्राच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहेत. या केंद्राचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेला २ ते अडीच टन वजनाचा एक महाकाय बैल आणि मुक्तपणे वावरणारे १०० ते १५० ससे. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि भाविक येथे गर्दी करतात.

एका बाजूला चारा टंचाई आणि वाढता खर्च असताना ४०० गायींचा सांभाळ करणे ही मोठी जिद्द आहे. आश्वी, दाढ, संगमनेर आणि राहाता येथील आठवडे बाजारात जो भाजीपाला किंवा चारा शिल्लक राहतो, तो कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा नागरिकांनी या गोशाळेत आणून द्यावा, असे आवाहन सुमतीलाल गांधी यांनी केले आहे. आपल्या घरातील शुभकार्यानिमित्त किंवा स्मृतीप्रत्यर्थ या मुक्या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी मदत करून नागरिकांनी या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलावा, हीच खरी पशुसेवा ठरेल.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *