सत्यजीत तांबेंचा ‘युवा नेत्यांना’ सणसणीत टोला
आदित्य ठाकरे, रोहित पवारांवर निशाणा?
मुंबई । झुंझार न्यूज
राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असतानाच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. निवडणुकीच्या निकालांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असतानाच, आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. “निवडणूक निकाल आपल्या मनासारखा लागला नाही म्हणून लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका,” अशा शब्दांत तांबे यांनी राज्यातील ‘युवा नेत्यांना’ खडे बोल सुनावले आहेत.

आमदार तांबे यांचा हा रोख थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निकालांमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. हे कल समोर येताच विरोधी पक्षांतील काही युवा नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेवर, विशेषतः ईव्हीएम आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचा समाचार घेतला.

आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येत असतानाच अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडत आहेत. हे नेते आपल्या पक्षातीलच त्या उमेदवारांचा अपमान करत आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून जनतेचा विश्वास संपादन केला आणि निवडणुकीत विजय मिळवला.

तांबे यांच्या मते, जेव्हा एखादा नेता निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करतो, तेव्हा तो केवळ व्यवस्थेवर नव्हे, तर त्यांच्याच पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरण्याचे काम करतो.

लोकशाहीमध्ये पराभव स्वीकारणे तितकेच महत्त्वाचे असते जितका विजय साजरा करणे. याच मुद्द्यावर बोट ठेवत तांबे पुढे म्हणाले, “केवळ आपल्या मनासारखा निकाल लागत नाही म्हणून लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे केवळ निवडून आलेल्या उमेदवारांचा नव्हे, तर मतदान करणाऱ्या जनतेचाही अपमान होतो.

सत्यजीत तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव प्रत्यक्षपणे घेतले नसले, तरी त्यांचा निशाणा आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यावरच असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे. आदित्य ठाकरे यांनी अनेकदा निवडणूक प्रक्रियेवर आणि घटनात्मक संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तांबे यांच्या या विधानामुळे आता महाविकास आघाडीतील युवा नेतृत्व आणि सत्यजीत तांबे यांच्यात नवा शाब्दिक कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

