आमदार अमोल खताळ यांनी दिला मदतीचा हात

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथे दोन गरीब कुटुंबांच्या घरांना अचानक लागलेल्या आगीत भीषण दुर्घटना घडली. या आगीत अण्णासाहेब कोरडे व चंद्रभागा कोरडे या दोन्ही कुटुंबांचे राहते घर आगीत पूर्णतः जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांचा संसार काही क्षणांत उद्ध्वस्त झाला असून कुटुंबीय अक्षरशः उघड्यावर आले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसगाव धुपे येथील कोरडे कुटुंबांच्या घराला अचानक आग लागली. आग इतकी तीव्र होती की घरातील कपडे, धान्य, भांडी, संसारोपयोगी साहित्य, कागदपत्रे व जीवनावश्यक वस्तू काही वेळातच जळून खाक झाल्या. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत सर्वस्व गमावल्याने कोरडे कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

 

या घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना मिळताच त्यांनी तात्काळ याची दखल घेत पत्नी नीलम खताळ यांना जळीतग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नीलम खताळ यांनी त्वरित शिरसगाव धुपे येथे घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अण्णासाहेब कोरडे व चंद्रभागा कोरडे यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. या कठीण प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.

 

आमदार खताळ यांच्या माध्यमातून जळीतग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून संसारोपयोगी साहित्य, किराणा सामान, धान्य, कपडे तसेच दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू देण्यात आल्या. या मदतीमुळे आगीत सर्वकाही गमावलेल्या कुटुंबांना तात्पुरता का होईना, मोठा आधार मिळाला आहे. तसेच पुढील काळात शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या मदतकार्यावेळी उपसरपंच प्रवीण दिघे, रामनाथ भोजने, पोपट चौधरी, अंकुश दिघे, भागवत कानवडे, आशिष कानवडे, संपत कानवडे, शरद कानवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून जळीतग्रस्त झालेल्या दोन्ही कोरडे कुटुंबांना शासनाकडून जेवढी शक्य होईल तेवढी सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. या कुटुंबांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीची गरज ओळखत त्यांना संसारोपयोगी आवश्यक वस्तू, किराणा साहित्य तसेच कपडे देण्यात आले आहेत. अशा कठीण प्रसंगी या कुटुंबांना आधार देणे हे आमचे सामाजिक कर्तव्य असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत पुढेही करण्यात येईल.

नीलम खताळ (सामाजिक कार्यकर्त्या)

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *