{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

गणित शिक्षक स्वप्निल शिंदे यांच्या अनोख्या संग्रहातून विद्यार्थिनींना इतिहास, संस्कृती व अर्थव्यवस्थेची प्रत्यक्ष अनुभूती

आश्वी । झुंझार न्यूज

इतिहासाच्या पुस्तकातील पाने वाचताना भूतकाळाची कल्पना येते; मात्र तोच इतिहास प्रत्यक्ष जुन्या नाण्यांमध्ये, बॉण्डमध्ये, चलनी नोटांमध्ये आणि पोस्टाच्या तिकिटांमध्ये अनुभवता आला, तर शिक्षण अधिक रंजक होते. असाच आगळावेगळा शैक्षणिक उपक्रम रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय, सात्रळ येथे पाहायला मिळत आहे. विद्यालयातील गणित शिक्षक श्री. स्वप्निल चंद्रकांत शिंदे यांनी उभारलेल्या ऐतिहासिक संग्रहामुळे विद्यार्थिनींना इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती मिळत आहे.

शिंदे यांच्या संग्रहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई, निजामशाहीतील नाणी, आणे-पैशांची जुनी नाणी, विविध मूल्यांची रुपयांची नाणी तसेच विविध कालखंडांतील स्मारक नाण्यांचा समावेश आहे. नाण्यांवरील अक्षरे, चिन्हे, राजमुद्रा, मूल्य आणि प्रतीकांमधून तत्कालीन राजकीय व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास विद्यार्थिनींना करता येतो.

संग्रहातील दुर्मीळ बॉण्ड हे विशेष आकर्षण ठरत आहे. बडोदे, होळकर, ग्वालियर, इंद्रगड, टोनक, पटियाला, जोधपूर, जैसलमेर, राजबुंदी, बिकानेर, नभा, धार आणि भोपाळ आदी संस्थानांशी संबंधित बॉण्ड जतन करण्यात आले आहेत. ब्रिटिशकालीन तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील विविध बॉण्डही या संग्रहात आहेत.

भारताबरोबरच अमेरिका, अंगोला, भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, इक्वेटोरियल गिनी, म्यानमार, पाकिस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेश, नेपाळ, सोमालिया आणि ट्रान्सनिस्ट्रिया आदी देशांच्या चलनी नोटा संग्रहात आहेत. हंगेरी, रोमानिया, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, पोलंड, डेन्मार्क, फिनलंड, जर्मनी, पाकिस्तान, बांगलादेश, भारत, इटली, स्पेन आणि सोव्हिएत युनियन आदी देशांची पोस्टाची तिकिटेही विद्यार्थिनींच्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत.

आजोबांकडून मिळाली संग्रहाची प्रेरणा

जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची प्रेरणा शिंदे यांना त्यांचे आजोबा गहिनीनाथ कदम यांच्याकडून मिळाली. आजोबांची जपून ठेवण्याची सवय आणि जुन्या वस्तूंबद्दलची आवड यामुळे शिंदे यांनी हा छंद जोपासला. पुढे नाणी, नोटा, बॉण्ड आणि तिकिटांचा संग्रह वाढवत नेला.

गणित विषयाचे शिक्षक असलेल्या शिंदे यांनी आपल्या वैयक्तिक छंदाला शैक्षणिक उपक्रमाची जोड दिली आहे. विद्यार्थिनींनी वस्तूंचे बारकाईने निरीक्षण करावे, प्रश्न विचारावेत, माहितीचा शोध घ्यावा आणि संशोधनवृत्ती विकसित करावी, हा या संग्रहामागील उद्देश आहे. त्यामुळे शाळेतील हा अनोखा संग्रह विद्यार्थिनींसाठी ‘चलते-फिरते संग्रहालय’ ठरत असून, इतिहासाला पुस्तकाबाहेर नेऊन प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. ब्राह्मणे मॅडम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरुण कडू पाटील तसेच जनरल बॉडी सदस्य मा. किरण कडू पाटील यांनी शिंदे यांच्या या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे व शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थिनींना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींची प्रत्यक्ष ओळख करून देणारा हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. शैक्षणिक दृष्टिकोनातून वैयक्तिक छंदाचा उपयोग विद्यार्थिनींच्या ज्ञानवृद्धीसाठी करण्याची शिंदे यांची संकल्पना कौतुकास्पद असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *