आश्वी । झुंझार न्यूज
१ लाख रुपयांच्या धनादेश अनादर (चेक बाउंस) प्रकरणात संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रसाद बी. जोशी यांनी आरोपीला दोषी ठरवत १ वर्षाचा साधा कारावास, २ लाख रुपये नुकसान भरपाई आणि ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

फिर्यादी ‘श्री. गजानन महाराज शुगर लि.’ या साखर कारखाना कंपनीने सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी आरोपी संजय मालक सागर (रा. संगमनेर) याला ऊस तोडणी व वाहतुकीचा कंत्राटदार म्हणून नियुक्त केले होते. कराराच्या अटींनुसार कंपनीने आरोपीला १ लाख रुपये आगाऊ (अॅडव्हान्स) दिले होते. मात्र, आरोपीने कराराप्रमाणे काम सुरू केले नाही. दिलेली आगाऊ रक्कम परत करण्यासाठी आरोपीने १ लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला.

कंपनीने सदर धनादेश बँकेत सादर केला असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो अनादरीत (बाउंस) झाला. त्यानंतर कंपनीने कायदेशीर नोटीस पाठवूनही १५ दिवसांच्या मुदतीत रक्कम न मिळाल्याने संगमनेर न्यायालयात फौजदारी केस क्र. ९१९/२०१८ दाखल करण्यात आली.

फिर्यादी कंपनीच्या वतीने ॲड. प्रणव श्रीकांत गोंगे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की: आरोपीने आगाऊ रक्कम स्वीकारल्याचे व काम न केल्याने धनादेश दिल्याचे सिद्ध होते.

निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम ११ stick आणि १३९ नुसार धनादेश हा कायदेशीर देणी देण्यासाठीच दिला गेल्याचे गृहीत धरले जाते.

आरोपीने ‘धनादेश केवळ सुरक्षेसाठी (सेक्युरिटी) दिला होता’ असा बचाव घेतला, परंतु या बचावाच्या समर्थनासाठी कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही.
दोन्ही बाजूंचे कागदोपत्री पुरावे, उलटतपासणी व सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या विविध दाखल्यांचा विचार करून न्यायालयाने आरोपीस कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवले.
१. कारावास: आरोपी संजय मालक सागर यास १ वर्षाचा साधा कारावास.
२. नुकसान भरपाई: फिर्यादी कंपनीस २ लाख रुपये नुकसान भरपाई.
३. व्याज: या भरपाईच्या रकमेवर २ सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष वसुली होईपर्यंत वार्षिक ९ टक्के साधे व्याज देण्याचा आदेश.
४. अतिरिक्त शिक्षा: नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपीला आणखी २ महिन्यांच्या अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा.
या खटल्यात फिर्यादी कंपनीच्या वतीने ॲड. प्रणव श्रीकांत गोंगे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. धनश्री राठी, ॲड. परिमल बांबेरे, ॲड. सोनाली बोटवे आणि ॲड. चेतन लखवानी यांनी सहकार्य केले.
Post Views: 12
