सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला पुष्प दुसरे
लोणी । झुंझार न्यूज
बदलत्या युगामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नातून ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक विचारसरणीला कृतीची जोड देत व्यावसायिक दृष्टिकोन जपा. मोठी स्वप्ने बघा. आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या आणि नवनवीन माहितीच्या माध्यमातून व्यवसायामध्ये पुढे जा कोण काय म्हणतं यापेक्षा आपले मन काय म्हणते ते करा यातूनच आपण यशस्वी उद्योजक होऊ शकतो यासाठी स्वतः आत्मविश्वासू रहा चांगली पुस्तके वाचा प्रतिपादन बीड येथील प्रसिध्द लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी केले.
लोणी येथे पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वतीने सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला वर्ष २५ वे या व्याख्यानमालेमध्ये २ रे पुष्प श्री.शरद तांदळे यांनी “तरुणांनो उद्योजक व्हा” या विषयावरती गुंफले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या व्याख्यानास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती आहेर, डाॅ.महेश खर्डे, ,डाॅ.आर.ए.पवार, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,प्राचार्य, शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी संवाद साधतांना शरद तांदळे म्हणाले,सध्याचे युग हे वेगवान आहे. आपले ध्येय शोधा त्यामध्ये आनंद आपल्याला कसा मिळवता येईल यासाठी आपली क्षमता वाढवा. स्वप्न बघा आणि ती स्वप्न प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला कसे पूर्ण करता येतील यासाठी प्रयत्न करा. मनामध्ये ठरवलेली गोष्ट आपल्याला ध्येयापर्यत घेऊन जात असते.नवनवीन ज्ञान आणि कौशल्य अवगत करा. उद्योजकतेचे स्वप्न बघा ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. यश मिळवण्यासाठी कृतीची गरज असते आणि ती प्रत्यक्ष कृती आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असते. आपली मनस्थिती ही आपली परिस्थिती घडवीत असते. सकारात्मक विचारातूनच आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो. देहबोली बदलली की आपली मनस्थिती ही बदलते. नेहमी मी आनंदी आहे मी उत्साही आहे असे रहा. ज्ञान मिळवतांना उद्योजकतेसाठी महापुरुषांची चरित्र वाचा. विद्यार्थ्यांनो आपण भाग्यवान आहोत आपल्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा जीवनपट आपल्यासमोर आहे त्यांनी कष्टातून या ठिकाणी सुरू केलेले सहकाराचे नंदनवन यातून आपण प्रेरणा घ्या. स्वाभिमानाने लढत रहा. कौशल्य मिळवत पुढे जा हा सुवर्णकाळ आहे तो निराशामध्ये वाया घालू नका असे असे सांगत ज्ञानाने समृद्ध होत आपण उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना छोट्या गोष्टी पासून सुरुवात करा छोट्या व्यवसायाचे रूपांतर हे मोठ्या व्यवसायामध्ये नक्की होईल हसत खेळत विद्यार्थ्यांना उद्योजकता, संधी, मानसिकता आणि भविष्य या विषयावरती व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृृृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचा र्या डॉ. अनुश्री खैरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी तर आभार प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या प्राचार्या सौ.विद्या घोरपडे यांनी मानले. पुढील व्याख्यान शनिवार दि.२४ जानेवारी रोजी पुणे येथील प्रसिद्ध निरूपणकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे युवा संवाद आजची तरुणाई आणि समाज व्यवस्था या विषयावरती होणार आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून डाॅ.सुस्मिता पाटील या शालेय शिक्षणाबरोबरच उद्योजकतेचे धडे या ठिकाणी देत आहेत येथील प्रवरा बिल्डिंग एक्सपो या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेली उलाढाल त्याचबरोबर सुरू असलेल्या विविध उपक्रमाचे उपक्रमातून या ठिकाणी उद्योजकता ही खऱ्या अर्थाने वाढीस लागते याचे याचेही कौतुक तांदळे यांनी केले.