आश्वी । झुंझार न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात मांचीहिल (आश्वी) येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेने आपला यशाचा आलेख उंचावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण १३३ विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शासकीय चित्रकला परीक्षेत शाळेचा निकाल दर्जेदार लागला आहे. यामध्ये ‘एलिमेंटरी’ स्तरावरील ८७ विद्यार्थी, तर ‘इंटरमिजिएट’ स्तरावरील ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी चित्रकलेचे बारकावे आत्मसात करत रेखाटलेल्या कलाकृतींना या परीक्षेत उत्तम श्रेणी मिळाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे अथक परिश्रम आणि शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन कारणीभूत आहे. विशेषतः कला विषय शिक्षिका प्रिया शिंदे व इतर शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सराव करून घेतला होता. कलेप्रती असलेली ओढ आणि शिक्षकांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी यशस्वी झाल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर, विश्वस्त डॉ. शैलेंद्रसिंह होडगर, डॉ. दिग्विजय होडगर, प्राचार्य विजय पिसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, संचालिका निलिमा गुणे, जनरल मॅनेजर किसन हजारे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, सुनील आढाव, मुख्याध्यापिका योगिता दुकळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्ञानगंगा विद्यानिकेतनने शैक्षणिक गुणावत्तेसोबतच कला क्षेत्रातही आपली मोहोर उमटवल्याने परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


