आश्वी । झुंझार न्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मांची हिल (आश्वी बुद्रुक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विशेष श्रम संस्कार शिबिराचा संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत हे शिबीर चालणार असून, ‘शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन’ हा या शिबिराचा मुख्य विषय आहे.

हजारवाडी येथे या शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच गणपत हजारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच तथा राजहंस दूध संघाचे संचालक विक्रमराजे थोरात, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, किसन हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.


यावेळी सरपंच गणपत हजारे म्हणाले की, “विद्यार्थी दशेत असताना सामाजिक कार्याची ओढ लागणे ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी श्रमदानातून गावाचा कायापालट करू शकतात. हजारवाडी व पानोडी ग्रामपंचायत या शिबिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल.”

यावेळी विक्रमराजे थोरात म्हणाले की, “शाश्वत विकासासाठी पाणी अडवणे आणि जिरवणे अत्यंत आवश्यक आहे. युवकांनी पाणलोट क्षेत्रातील बारकावे समजून घेऊन पडीक जमिनीचा विकास कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करावे. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व श्रमसंस्कृती रुजण्यास मदत होईल.”

हजारवाडी येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांकरिता मंडप टाकण्यात आला असून या सात दिवसांच्या कालावधीत विद्यार्थी हे स्वयंसेवक बनून हजारवाडीत विविध उपक्रम राबविणार आहेत.

यामध्येपाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण व जलसंधारणाची कामे , पडीक जमिनीचे व्यवस्थापन व वृक्षारोपण ,
ग्रामस्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती ,
व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन व महिला सक्षमीकरण या विषयांवर पथनाट्ये व व्याख्याने ,ग्रामस्थांशी संवाद आणि सामाजिक सर्वेक्षण आदी


या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी विशेष परिश्रम घेत आहेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed