८३ वर्षीय वसंत ताजणे गुरुजींच्या उपस्थितीने सोहळा भारावला

आश्वी । झुंझार न्यूज
मांढरेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते शाळेचे ८३ वर्षीय माजी शिक्षक श्री. वंसत उर्फ महादु सहादु ताजणे गुरुजी. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमास विशेष भावनिक साज चढला.

शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. लक्ष्मण भोसले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविकात शाळेचा गौरवशाली इतिहास सांगत उपस्थितांचे स्वागत केले.
गुरुजींवर गुलाबपाकळ्यांची उधळण
शिस्तप्रिय व अत्यंत लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळख असलेले श्री. वसंत ताजणे गुरुजी शाळेच्या प्रांगणात दाखल होताच माजी विद्यार्थ्यांनी गुलाबपाकळ्यांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून गुरुजी भावूक झाले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला असता अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माजी विद्यार्थ्यांमधील समन्वय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने यावेळी ‘शालेय माजी विद्यार्थी समिती’ ची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सौ. लिलाबाई बाळासाहेब मांढरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी बापूसाहेब भवर, माजी उपसरपंच सुनील मांढरे, तुषार मांढरे व सौ. अंजली मांढरे यांनी मनोगत व्यक्त करत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण, संस्कार आणि शिक्षकांचे जीवनातील मोलाचे योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमास भाऊसाहेब शिंदे, कुणाल डुबे, दत्तू कदम, प्रदीप मांढरे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने श्रीमती वर्षा दातीर म (विशेष शिक्षक, दिव्यांग विभाग, पंचायत समिती संगमनेर) यांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार श्री. दत्तू मुंढे यांनी मानले.

याप्रसंगी श्री. प्रदीप मांढरे व सौ. अंजली मांढरे यांनी शाळेला प्रेशर रेग्युलेटर, नळी व शेगडी अशी उपयुक्त साहित्य भेट वस्तूरूपाने प्रदान केली.



