भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली असून, प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी करवसुलीवर भर देण्याचे निश्चित करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गणपत हजारे होते. तर राजहंस दूध संघाचे संचालक तथा उपसरपंच विक्रम थोरात, सोसायटी चेअरमन बबनराव कराड , अशोक तळेकर, रावसाहेब घुगे, भारत शेवाळे , वेणुनाथ पाबळ , जालिंदर तळेकर , रंगन्नाथ मुंढे , नानासाहेब कदम , पत्रकार राजेश गायकवाड यांच्यासह आरोग्यसह विविध विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी थकीत व चालू करवसुलीचे काटेकोर नियोजन या सभेत करण्यात आले. तसेच, ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना आता अधिकृतपणे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यावर सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले, ज्यामुळे पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन स्थानिक पातळीवर अधिक सक्षमपणे करता येईल.
गावात स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत ‘ओला व सुका कचरा’ विलगीकरणाचे मॉडेल राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या श्वानांच्या निवाऱ्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल ग्रामपंचायतीने उचलले आहे.
ग्रामसभेत ‘बालविवाह मुक्त भारत’ करण्याची शपथ सर्व उपस्थितांनी घेतली. एकल महिलांना ‘उमेद’ अभियानाशी जोडून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, तसेच बाल अत्याचार प्रतिबंधासाठी समाजात जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’आणि ‘आदिशक्ती’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
आपले सरकार सेवा केंद्रा’द्वारे नागरिकांना मिळणाऱ्या ५९२ सेवांची माहिती ग्रामसेवकांनी दिली. पारदर्शकता आणि सुलभतेसाठी ग्रामपंचायतीच्या व्यवहारात ‘क्यूआर कोड’चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, मंजूर असलेली परंतु अद्याप अपूर्ण असलेली घरकुल बांधकामे ३१ जानेवारीपर्यंत युद्धपातळीवर सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आगामी २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात कृषी, पशुसंवर्धन आणि सौर ऊर्जेसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
सभेच्या सुरुवातीला ग्रामसेवक सुरेंद्र बाह्मणे यांनी प्रशासकीय विषयांचे वाचन केले. आरोग्य अधिकारी वदक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली. सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी ‘ बालविवाह व टी बी मुक्त भारत’ आणि ‘स्वच्छता’ राखण्याची सामूहिक शपथ घेतली.