उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन
बारामती । झुंझार न्यूज
महाराष्ट्र राजकारणातील एक कणखर, धडाडीचे आणि जनमानसात ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज (२८ जानेवारी २०२६) सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरली असून राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अजित पवार हे एका खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामती विमानतळावर उतरत असताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाने आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सकाळी ८:४५ च्या सुमारास विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर कोसळले. या विमानाला भीषण आग लागली होती. विमानातील अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिकांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘ झुंझार न्यूज’ च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली:
अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘ झुंझार न्यूज मधून आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “अजितदादा पवार हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या विकासाचे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू होते. प्रशासनावरील पकड, स्पष्टवक्तेपणा आणि पत्रकार बांधवांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध नेहमीच स्मरणात राहतील. माध्यम क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यांच्या निधनाने माध्यम क्षेत्राचा एक मोठा आधार हरपला आहे.”
एक झंझावाती राजकीय प्रवास:
बारामतीचे आमदार म्हणून सलग अनेक दशके नेतृत्व करणारे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा गाडा हाकताना त्यांनी सिंचन, वित्त आणि नियोजन क्षेत्रात आपला ठसा उमटवला. सत्तेत असो वा विरोधात, त्यांच्या कामाचा वेग आणि पहाटेपासून कामाला लागण्याची त्यांची शिस्त ही कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली.
अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. संपूर्ण राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून बारामतीसह संपूर्ण पुण्यात सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.”