राज्यातील अधिकारी-कर्मचारी मैदानात उतरणार; नामवंत खेळाडूंची लाभणार उपस्थिती

 

 

शिर्डी । झुंझार न्यूज

 


अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी आणि शिर्डी परिसरातील वातावरण आगामी काळात क्रीडामय होणार आहे. जलसंपदा विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा थरार येत्या ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार असून, या ‘क्रीडाकुंभा’साठी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आपले प्रशासकीय कसब बाजूला सारून मैदानात खेळाडू म्हणून आपली चमक दाखवणार आहेत.

Oplus_131072


स्पर्धेचे अधिकृत रणशिंग शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर फुंकले जाईल. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी अर्जुन पुरस्कार विजेते व भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाठ, शिवछत्रपती पुरस्कार विजेती खो-खो पटू श्वेता गवळी आणि बेसबॉल पटू अक्षय आव्हाड हे नामवंत खेळाडू विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धांचे यजमानपद यंदा अहिल्यानगर जिल्ह्याकडे आले आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने या स्पर्धांचे नियोजन अत्यंत नेटके केले आहे. राज्यभरातील विविध विभागांतून हजारो कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोणीत दाखल होणार आहेत.


स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा रविवार, ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेत पार पडेल. या कार्यक्रमासाठी नामवंत धनुर्विद्या प्रशिक्षक डॉ. शुभांगी दळवी, वेटलिफ्टर कोमल वाकळे आणि सॉफ्टबॉल पटू फिजा सय्यद यांची विशेष उपस्थिती असणार आहे. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येईल.


या भव्य क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जलसंपदा विभागाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या नियोजनात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभागाने मोलाचे सहकार्य केले आहे. लोणी आणि शिर्डी ही दोन्ही शहरे या क्रीडा उत्सवासाठी सज्ज झाली असून, क्रीडा प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *