आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने नगरसेवकांचा बीएमसी दौरा

मुंबई । झुंझार न्यूज

संगमनेर शहराच्या नियोजित विकासाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि ‘संगमनेर २.० व्हिजन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिका अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नगरसेवकांनी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेटी देऊन तेथील प्रशासकीय कार्यपद्धती आणि नागरी सुविधांच्या व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली.

प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभ्यास दौऱ्यात माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीचे सर्व नगरसेवक आणि नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ वॉर्ड (ग्रँड रोड) कार्यालयाला भेट दिली. यावेळी येथील नागरी सुविधा केंद्र (CFC), घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिःसारण प्रकल्प (STP) या तीन मुख्य विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

व्हिजन २.०’ ला मिळणार गती

संगमनेर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. मुंबईसारख्या महानगरात कचरा व्यवस्थापन कसे केले जाते, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर कसा होतो आणि नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा कशा पुरवल्या जातात, याचे बारकावे नगरसेवकांनी जाणून घेतले. हा अनुभव संगमनेरमधील भावी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

नागरिकाभिमुख प्रशासनावर भर

या दौऱ्याबाबत बोलताना सांगण्यात आले की, “संगमनेर शहराला अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्यासाठी जागतिक दर्जाच्या नागरी सुविधांची आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिकेचे मॉडेल अभ्यासून त्यातील चांगल्या गोष्टी संगमनेरमध्ये लागू करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निवारण जलद गतीने होईल आणि प्रशासकीय पारदर्शकता वाढेल.”


या अभ्यास दौऱ्याचा उद्या दुसरा दिवस असून, यादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या अन्य महत्त्वाच्या विभागांना आणि काही नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी दिल्या जाणार आहेत. या दौऱ्यामुळे संगमनेर नगरपरिषदेच्या आगामी कार्यपद्धतीत मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed