इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या सीएसआर योजनेअंतर्गत दिव्यांगजनांना मोफत सहाय्यक साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अकोले (जि. अहिल्यानगर) येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये व्हीलचेअर, कुबड्या, चालण्याच्या काठ्या, श्रवणयंत्र, ८० टक्के अस्थिव्यंग असलेल्या व्यक्तींसाठी बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल, सेरेब्रल पाल्सी खुर्ची, अंध व्यक्तींसाठी ब्रेल किट, सुगम्य केन, स्मार्टफोन, ADL किट, रोलेटर्स, बॅटरी चलित व्हीलचेअर, TLM किट इत्यादी सहाय्यक साधनांसाठी पात्र लाभार्थ्यांची तपासणी व नोंदणी करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या पात्रता निकष व मार्गदर्शक तत्त्वांनुसार लाभार्थ्यांची नोंदणी करून ३१ मार्च २०२६ पर्यंत अकोले येथे उपकरणांचे वितरण करण्यात येणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड व रेशन कार्डची मूळ प्रत तसेच एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच पात्रतेनुसार संबंधित दिव्यांग व्यक्तीने यापूर्वी मागील तीन वर्षांत केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेतून सहाय्यक साधने घेतलेली नसावीत.
या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अकोले तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत आवश्यक सहाय्यक उपकरणे पोहोचवून त्यांचे जीवन अधिक सुलभ व सोयीस्कर बनवणे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील, अध्यक्ष, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांनी केले आहे.
याशिवाय या शिबिरादरम्यान विखे पाटील मेमोरियल, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
अकोले तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.