अकोले । झुंझार न्यूज
भंडारदरा परिसरातील शेंडी येथे २८ फेब्रुवारी रोजी ‘धम्म-यात्रा २०२६’ आणि कालकथित दादासाहेब रूपवते यांची १०१ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांना अकोले, संगमनेर, नाशिक, नगर, इगतपुरी आणि पुणे या भागांतून जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दिवसाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. यावेळी कालकथित दादासाहेब रूपवते, का. प्रेमानंद रूपवते आणि का. स्नेहजाताई रूपवते यांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले. पंचशील ध्वजारोहण आणि बुद्ध वंदनेनंतर जपानवरून आलेले भन्ते तेरासावा गुरुजी आणि पुणे येथील भंते नागघोष यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना धम्म-देसना दिली. या प्रसंगी सुशिलाबाई दादासाहेब रूपवते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दुपारच्या सत्रात शेंडी गावातील क्रांतिवीर यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध गावांतील पारंपरिक वाद्य ताफे आणि महिलांच्या लेझीम पथकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निळ्या निशाणांच्या जयघोषाने आणि पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण शेंडी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाच्या मुख्य धम्म सभेचे स्वागत आणि प्रास्ताविक उत्कर्षा रूपवते यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. संघराज रूपवते होते. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे लाभले होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत धम्म आणि सामाजिक परिवर्तनावर भाष्य केले. तसेच प्रा. आनंद देवडेकर, आमदार डॉ. किरण लहामटे आणि कॉ. डॉ. अजित नवले यांनीही आपले विचार व्यक्त करत दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला
समाजाप्रती आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी ‘दादासाहेब रूपवते जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये मा. बाबुराव निकाळे, मा. बन्सीभाऊ त्रिभुवन, मा. आर. एस. अभंग आणि मा. सुरेश रोकडे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. पोपटराव सोनवणे व मा. विनय घोसाळे यांनी केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिलीप भांगरे, विजयराव वाकचौरे, विनय सावंत, एम.डी. सोनवणे, सुधाकर देशमुख, सुरेश कोते, व्ही. एम. बैचे, हौसाबाई जगधने, अनुराधा आहेर, अजीज वोहरा, वैभव मोकल, रविंद्र पवार यांच्यासह धम्मयात्रा ग्रामीण व मुंबई कमिटीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बहुजन शिक्षण संघ, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भंडारदरा परिसरात वैचारिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला.



