शाळा हे मंदिर जपण्याचे काम ग्रामस्थांनी करावे; उद्योगपती सागर गिते यांचे आवाहन
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी – अजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या एसएससी (SSC) बोर्ड परीक्षेत आपल्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, कु. अदिती संतोष गाडेकर हिने ९४% गुण मिळवून आश्वी केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. या घवघवीत यशाबद्दल ‘आम्ही पिंप्रीकर’ व्हॉट्सॲप ग्रुप, ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी विद्यार्थिनींचा व शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शिक्षणानेच होतो कुटुंबाचा विकास: सागर गिते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना न्याय डेरीचे चेअरमन तथा तरुण उद्योगपती सागरराव गिते म्हणाले की, “शिक्षण हे वाघिणीचे दूध असून शाळा हे कलियुगातले मंदिर आहे. हे मंदिर जपण्याचे काम सुशिक्षित युवक-युवती व ग्रामस्थांनी केले पाहिजे. एक मुलगा किंवा मुलगी शिकली तर दोन कुटुंबांचा उद्धार होतो. आपल्या पिंप्री गावातील विद्यार्थ्यांनी पूर्वी आश्वी केंद्रात सलग २०-२५ वर्षे प्रथम येण्याचा मान मिळवला आहे, तो वारसा या विद्यार्थिनींनी पुन्हा जागा केला आहे.
यावेळी सागर गिते यांनी विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच, प्रवरा माध्यमिक विद्यालयासोबतच जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी त्यांनी खारीचा वाटा उचलला असून, भविष्यात गावात अत्याधुनिक ‘लायब्ररी’ सुरू करण्याची महत्त्वपूर्ण ग्वाही त्यांनी दिली.
आश्वी केंद्रात अव्वल ठरलेल्या अदिती गाडेकर (९४%) हिच्यासह विद्यालयात द्वितीय आलेली कु. अनुष्का गुलशन कदम (८८%) आणि तृतीय क्रमांकाची कु. प्रतीक्षा शिवाजी लाव्हरे (८७%) तसेच इतर गुणवंत विद्यार्थिनींचा शाही सत्कार करण्यात आला. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भारतराव पाटील गिते यांनी मार्गदर्शक भाषणात सांगितले की, “गावातील जत्रा आणि सप्ताह हे आध्यात्मिक कार्यक्रम होतच राहतील, परंतु आता शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी तन-मन-धनाने एकत्र येण्याची गरज आहे. केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता आपल्या शाळा आदर्श करण्याची जबाबदारी आपली आहे.

या सोहळ्यासाठी व्यासपीठावर सरपंच सौ. संगीता गिते, उपसरपंच बाजीराव गिते, माजी प्राचार्य अशोकराव गिते, विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब लाव्हरे, उपाध्यक्ष रामदास पाटील दातीर, संजय बिडवे, बाळासाहेब गीते, मुख्याध्यापक तायगा शिंदे, बाबासाहेब दातीर, भास्करराव गीते, विजयराव कदम, रमेशशेठ गिते, भाऊसाहेब घुगे, दादाहारी गीते यांसह ‘आम्ही पिंप्रीकर’ ग्रुपचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि प्रवरा संस्थेच्या सीईओ डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनीही अभिनंदन केले आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पिंप्रीकर ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.




