आश्वी । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील चिंचपूर-दुर्गापूर शिवारात मंगळवारी (१२ मे) दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोरीची एक थरारक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून एका महिलेला मारहाण करत कपाटातील १० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

 

शिर्डी विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चिंचपूर-दुर्गापूर शिवारात रवींद्र संपत थेटे यांच्या वस्तीशेजारी गणपत देवराम पारधे यांचे निवासस्थान आहे. मंगळवारी दुपारी पारधे कुटुंबातील बहुतांश सदस्य काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात केवळ त्यांची लहान सून आणि एक छोटे बाळ होते. हीच संधी साधून दोन पुरुष आणि दोन महिला अशा एकूण चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला.


या चोरट्यांनी घरातील सुनेला मारहाण केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. त्यानंतर घराची उचकापाचक करून कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख लंपास केले. चोरट्यांनी आपली दुचाकी घरापासून काही अंतरावर लांब उभी केली होती. चोरी केल्यानंतर सर्व आरोपी दुर्गापूर गावाच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) डॉ. कुणाल सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आठरे आणि आश्वी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ हे आपल्या पथकासह दाखल झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून तपासासाठी तातडीने श्वान पथकाला (Dog Squad) पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात १० हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली असली तरी, पोलीस अधिक सखोल चौकशी करत आहेत.


भरदिवसा झालेल्या या चोरीच्या आणि मारहाणीच्या घटनेमुळे चिंचपूर-दुर्गापूर परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. चोरट्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याने ही टोळी नेमकी कुठली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी लोणी आणि आश्वी पोलीस संयुक्तपणे तपास करत असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed