सीपीआर व प्रथमोपचार प्रशिक्षणातून पायरेन्सचा जीवनरक्षणाचा जागर; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
झरेकाठी । झुंझार न्यूज
अपघात, हृदयविकाराचा झटका किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या काही मिनिटांत मिळालेली योग्य मदत एखाद्या व्यक्तीला नवजीवन देऊ शकते. त्यामुळे सीपीआर (हृदय पुनरुज्जीवन) या जीवनरक्षक तंत्राचे ज्ञान केवळ वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनाच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पायरेन्स आयबीएमएचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आपत्ती व्यवस्थापनविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार पायरेन्स आयबीएमए, लोणी येथे सीपीआर व प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी सुरक्षितता, बचावकार्य आणि जीवनरक्षक कौशल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
पायरेन्स संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच संस्थेचे सचिव व संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रशिक्षणासाठी विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर येथील जीवनरक्षक प्रशिक्षण पथकातील डॉ. शितल जयकर, डॉ. तृषा क्षीरसागर, डॉ. अभिजय नायर, डॉ. अक्षता सोमणकर आणि तंत्रज्ञ विलास पवार यांनी मार्गदर्शन केले. हृदयक्रिया बंद पडल्याची लक्षणे ओळखणे, सीपीआरची आवश्यकता, छातीवर दाब देण्याची योग्य पद्धत, आपत्कालीन मदत बोलावणे आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाला प्राथमिक जीवनरक्षक मदत देणे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
प्रशिक्षणामध्ये केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना सीपीआरची प्रक्रिया कृतीतून समजून घेता आली. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता प्रसंगावधान राखून योग्य मदत करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीवही या प्रशिक्षणातून करून देण्यात आली.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, सेवाभाव आणि संकटसमयी मदतीसाठी पुढाकार घेण्याची वृत्ती विकसित व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. यावेळी डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल व महाविद्यालयाचे प्राचार्य तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीपकुमार जोंधळे, पायरेन्स आयबीएमएचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.