{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

सहकारात राजकारण नको, सर्व संचालकांना विश्वासात घेऊन निर्णय

 

पारनेरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारली

 

नगर | झुंझार न्यूज

 

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील, अशी स्पष्ट भूमिका मांडली. सहकारात राजकारण नको, या भूमिकेतून सर्वांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले. मात्र काही जागांवर निवडणूक झालीच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेच्या सर्व जागा बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा होती. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. जामखेडमध्ये उमेदवाराने माघार घेतल्याने बिनविरोध निवडणूक करण्यात यश आले; मात्र कर्जत आणि पारनेरमध्ये प्रयत्न अपुरे पडले. उमेदवाराला आणखी एक दिवस भेटण्याची संधी मिळाली असती, तर कर्जतमध्येही बिनविरोध निवडणूक झाली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणीही संयम सोडला नाही. बँकेच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचेल, असे आरोप-प्रत्यारोप किंवा चिखलफेक झाली नाही, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सभासदांनी सहकार विकास आघाडीला बहुमत दिले असून, संचालक मंडळातील सर्वांना एकत्र बसवून अध्यक्षपदाबाबत चर्चा केली जाईल. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी सांगितले.

पारनेरच्या पराभवाची जबाबदारी माझी!

पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांच्याविरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याने निवडणूक लढवली. या लढतीत खासदार नीलेश लंके विजयी झाले, तर राहुल शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे दुःख असून, त्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. पराभूत उमेदवारांनाही जिल्हा बँकेच्या कारभारात विश्वासात घेतले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सर्व संचालकांना विश्वासात घेणार

सहकार विकास आघाडीच्या माध्यमातून नऊ संचालकांचे बहुमत झाल्याचे सांगताना त्यांनी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील, असे सांगितले. सर्व संचालकांची मते जाणून घेतल्यानंतर अध्यक्षपदाचा निर्णय होईल.

निवडणुकीनंतर डॉ. विखे पाटील यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. यावेळी गणपत सांगळे, संजीवनी शिंदे, भैरवनाथ पिचड, सचिन जगताप, दत्ता पानसरे, करण ससाणे आदी नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

बँकेचा कारभार करताना सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी हिताचे निर्णय घेण्यालाच प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *