अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त भागांत सरसकट पंचनाम्यांच्या सूचना
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यात ज्या-ज्या भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या सर्व भागांत सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महायुती सरकार शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आ. अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आमदार खताळ म म्हणाले की, धांदरफळ, निमज, राजापूर, चिखली, निमगाव पागा,पेमगिरी,नांदुरी, दुमाला वडगाव,लांडगा, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी,गुंजाळवाडी,वेल्हाळेचिकणी आणि निमगाव भोजापूर, या गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, वादळीवाऱ्यामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.आपण स्वतः काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून याबाबत संबंधित अधिकार्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून ते तातडीनेअचूक करण्यात यावेत,तसेच एक ही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्या बाबतच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विशेषतः महिला व बाल रुग्णालयाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून, एमआयडीसीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. फक्त नोटिफिकेशन जाहीर होणे बाकी आहे.
— अमोल खताळ (आमदार)
………………………………………..

जलजीवन योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा विधानसभेत
जलजीवन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात असले, तरी काही ठेकेदार टोळीच्या संगनमतामुळे या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला असल्याचा आरोप आमदार खताळ यांनी केला. या मूलभूत प्रश्नाकडेही विधानसभेचे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले.शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख व्हाव्यात व त्याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले


