माजलगाव । झुंझार न्यूज
निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील युती सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट करावी, तसेच थकीत ऊस बिले व्याजासह त्वरित अदा करावीत, अशी आग्रही मागणी किसान सभेचे नेते तथा माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली. माजलगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून गृहखात्यावर आणि भोंदू बाबा प्रकरणावरून सरकारमधील मंत्र्यांवर कडाडून टीका केली.
‘फसवी कर्जमाफी नको, शब्द पाळा‘
डॉ. नवले म्हणाले की, “राज्यातील सध्याचे युती सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले. मात्र, सत्तेत आल्यानंतर आता कर्जमाफीसाठी विविध अटी, शर्ती आणि मर्यादा घातल्या जात आहेत. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. सरकारने आपला शब्द पाळून सरसकट आणि विनाअट कर्जमाफी द्यावी. तसेच, गेल्या तीन महिन्यांपासून अनेक साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट दिलेले नाही. ही थकीत बिले व्याजासह त्वरित जमा करावीत.”

भोंदू बाबांच्या संपर्कातील ‘त्या’ ३९ आमदारांवर कारवाई करा
नाशिक येथील गाजत असलेल्या भोंदू बाबा प्रकरणावर भाष्य करताना डॉ. नवले यांनी सरकारला धारेवर धरले. “या भोंदू बाबाच्या संपर्कात सरकारमधील काही मंत्री, ३९ आमदार आणि अनेक राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर येत आहे. केवळ बाबावर कारवाई करून चालणार नाही, तर त्याला पाठबळ देणाऱ्या या सर्व सत्ताधारी नेत्यांवरही तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना डॉ. नवले म्हणाले की, “महाराष्ट्र सध्या जातीय अत्याचार, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या घटनांनी हादरला आहे. सरकारची दुटप्पी भूमिका याला जबाबदार आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.”
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, थकीत ऊस बिले आणि पीक विम्याचे प्रश्न सरकारने वेळेत न सोडवल्यास आगामी काळात महाराष्ट्रभर मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही डॉ. अजित नवले यांनी यावेळी दिला.

या पत्रकार परिषदेला किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, DYFI युवक संघटनेचे अध्यक्ष मोहन जाधव, ज्येष्ठ माकप नेते कॉ. मुसद्दीक बाबा सर, तालुका सचिव कॉ. शिवाजी कुरे, कॉ. कृष्णा सोळंके, लहू खारगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

