महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांत ऐतिहासिक सामंजस्य करार

‘मिशन ५० लिटर’ने होणार दुसरी दुग्धक्रांती

संगमनेर । झुंझार न्यूज

सहकार आणि दुग्धोत्पादनात राज्याला दिशा देणाऱ्या संगमनेर तालुक्याने आता देशपातळीवर पाऊल टाकले आहे. माजी महसूलमंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या दुग्धोत्पादनात मोठी क्रांती झाली असून, या व्यवसायाला अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानस्नेही बनवण्यासाठी महाराष्ट्र व पंजाब या दोन राज्यांमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. ‘मिशन ५० लिटर’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत हा करार करण्यात आला असून, संगमनेरचा हा पॅटर्न आता संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

‘मिशन ५० लिटर’ कार्यशाळेत करारावर स्वाक्षरी

वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने (राजहंस दूध संघ) आयोजित १५०० युवक दूध उत्पादकांच्या कार्यशाळेत हा करार पार पडला. महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आणि पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या करारामुळे महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमधील दुग्ध व्यवसायातील संशोधनाची आणि नवनवीन संकल्पनांची देवाणघेवाण होणार आहे.

१. कमी गाई, जास्त उत्पादन: कमी संख्येने गाई पाळून त्यांच्याकडून ५० लिटरपर्यंत दूध उत्पादन कसे घेता येईल, यावर संशोधन केले जाईल.
२. तंत्रज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण: पंजाबमधील प्रगत दुग्धव्यवसायातील प्रयोग, गाईंचे आरोग्य, आहार आणि व्यवस्थापन याबाबतचे मार्गदर्शन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
३. प्रत्यक्ष भेटी: तालुक्यातील शेतकऱ्यांना पंजाबमधील आधुनिक गोठ्यांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “दुग्ध व्यवसायाने ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मजबूत केला आहे. आपल्या सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना नेहमीच योग्य भाव दिला आहे. आता काळानुसार बदलत ‘कमी गाई आणि जास्त दूध’ हे सूत्र स्वीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘मिशन ५० लिटर’ ही एक मोठी मोहीम म्हणून राबवावी, जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी वाढेल.”

राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी सांगितले की, “मिशन ५० लिटर अंतर्गत २५ अनुभवी डॉक्टरांकडे प्रत्येकी १० शेतकऱ्यांच्या १० गाईंची (एकूण २५० गाई) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत ५० लिटर दूध देणाऱ्या गाई तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पंजाबच्या सहकार्यामुळे हे उद्दिष्ट गाठणे अधिक सोपे होईल.”

पंजाबच्या शिष्टमंडळाकडून संगमनेरचे कौतुक

पंजाबचे दलजीतसिंग गिल यांनी संगमनेरमधील सहकार मॉडेलचे कौतुक केले. ते म्हणाले, “संगमनेरने नेहमीच राज्याला दिशा दिली आहे. ‘मिशन ५० लिटर’ हा उपक्रम दुग्ध क्षेत्रातील दुसरी मोठी क्रांती ठरेल आणि संगमनेरचा हा पॅटर्न लवकरच देशभर चर्चिला जाईल.”

या सोहळ्याला संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, पंजाब पीडीएफएचे खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांच्यासह विविध संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि तालुक्यातील शेकडो युवक व महिला दुग्धोत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर चालणाऱ्या या तालुक्यातून दररोज ९ लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असून, या नवीन करारामुळे आगामी काळात संगमनेर हे देशातील दुग्ध व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *