विखे पाटील यांचा ‘शब्द’ पूर्ण, ३२ गावांचे स्वप्न साकारणार

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३२ गावांच्या पिढ्यानपिढ्यांच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत कळीच्या ठरलेल्या ‘साकळाई उपसा सिंचन योजने’ला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी (१ एप्रिल) अंतिम मंजुरी दिली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेला शब्द यानिमित्ताने पूर्ण झाला आहे.

१२३४ कोटींचा प्रकल्प; ९६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी एकूण १,२३४.१३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांमधील ९,६०० हेक्टर शेती क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेद्वारे १.६० टीएमसी पाणी सिंचनासाठी आणि ०.२० टीएमसी पाणी पिण्यासाठी, असे एकूण १.८० टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


ही योजना अत्यंत आधुनिक पद्धतीने राबवली जाणार आहे. याचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत

१. पाणी उचलण्याचे ठिकाण: म्हैसगाव येथून ४ टप्प्यांत पाणी उपसा केला जाईल.
२. उपसा क्षमता: तब्बल २०८.३४ मीटर उंचीवर पाणी उचलून ते चिखली आणि घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात सोडले जाईल.
३. पाणी साठवण: या योजनेतून खरीप हंगामात (१५ जुलै ते १५ ऑक्टोबर) पाणी उचलून भागातील लघु पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे आणि गाव तळे भरून घेतली जातील.
४. कामकाज: म्हैसगाव येथे तातडीने पंपगृह बांधले जाणार असून, एकूण ४ पंपगृह आणि ३ वितरिकांद्वारे हे काम पूर्ण होईल.
५. भूसंपादन: प्रकल्पासाठी ३९.७१ हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यापैकी ३०.२२ हेक्टर खाजगी जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

‘बोले तैसा चाले’: विखे पाटलांचा शब्द खरा ठरला

२०१९ च्या निवडणुकीपूर्वी १६ एप्रिल रोजी वाळकी येथील जाहीर सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्रीपद मिळाल्यावर या योजनेच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणि निधीची तरतूद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. डॉ. सुजय विखे पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीत “ही योजना आम्हीच पूर्ण करू” असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे विखे पिता-पुत्रांनी दिलेला शब्द पाळल्याची भावना मतदारसंघात व्यक्त होत आहे.

४ वर्षांत योजना पूर्ण होणार: डॉ. सुजय विखे पाटील

या निर्णयावर समाधान व्यक्त करताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “साकळाई योजना हा आमच्यासाठी केवळ प्रकल्प नसून तो या भागातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि जगण्याचा प्रश्न होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा लढा यशस्वी केला आहे. पुढील ४ वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.”

 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे ३२ गावांतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, हा भाग आता सुजलाम् सुफलाम् होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *