पाथरे । झुंझार न्यूज

 

राहाता तालुक्यातील पाथरे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज वाहक तार तुटून पडल्याने गोपाल सोपान घोलप यांच्या १० गायी दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोलप यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच या नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीने सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाथरे आणि पंचक्रोशीत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेत पालकमंत्र्यांनी महसूल आणि कृषी विभागाला संयुक्तपणे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या असून विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या अभियंत्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा, असे निर्देश ना. विखे पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.


हवामान विभागाने पुढील काही दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काढणीला आलेला शेतीमाल आणि पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, जेणेकरून पुढील आर्थिक हानी टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री. गाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संपत तांबे, बाजार समितीचे उपसभापती आण्णासाहेब कडू, सरपंच उमेश घोलप, डॉक्टर खपके, ॲड. आप्पासाहेब दिघे, भाऊसाहेब घोलप, शिवाजी घोलप, भास्कर घोलप, आबासाहेब घोलप, सोपानराव घोलप, सागर कडू, मंगेश घोलप, तेजस कडू, मच्छिंद्र घोलप, संकेत दिघे, प्रदीप गाडेकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही ना. विखे पाटील यांनी यावेळी दिली.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *