डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्याला अभिवादन
संगमनेर । झुंझार न्यूज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना मान-सन्मान मिळाला असून, त्याच संविधानाच्या बळावर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, पूर्वी समाजामध्ये अस्पृश्यता, शिक्षणाबाबत उदासीनता आणि अंधश्रद्धा यांचा मोठा प्रभाव होता. मात्र, डॉ. आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि लढा” हा मूलमंत्र देऊन समाजातील विषमता दूर करण्याचे काम केले. त्यांच्या कार्यामुळे सर्व समाजघटकांना न्याय मिळाला आहे.काही जण शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वापर केवळ भाषणांपुरता व निवडणुकां पुरता करतात; मात्र आम्ही त्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत आहोत, असे सांगत आमदार खताळ यांनी विरोधकांवर टीका केली.
या कार्यक्रमाला आरपीआयचे ज्येष्ठ नेते संतोष रोहम, आर पी आय (आठवले गट) तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, रमेश काळे, मंजाबापू साळवे राजेंद्र बलसाने देविदास कदम, किशोर वाघमारे शशांक नामन, लाला दायमा, अक्षय वर्पे, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, विकास जाधव, संगीता पुंड, रेखा गलांडे, सपना जाधव, अर्पिता पगारे, श्याम कोळपकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
“संगमनेरमध्ये मागील राज्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू करण्याचा पायंडा पाडला, ही फार मोठी खंत आहे. पुतळ्याचे टेंडर काढल्याचे सांगत काहीजणांनी यावर राजकारण सुरू केले आहे; मात्र मला त्या राजकारणात पडायचे नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात येणार आहे.”