{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आमदार अमोल खताळ यांचे जलसंवर्धनाचे आवाहन

संगमनेर । झुंझार न्यूज

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, गोदावरी मराठवाडा आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ चा भव्य शुभारंभ संगमनेर येथील संगमनेर महाविद्यालयातील मातोश्री बाफना सभागृहात पार पडला. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. “चला, पाण्याचे करूया संवर्धन.. वसुंधरेचे होईल रक्षण!” हा संदेश देत १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा पंधरवडा राज्यभर साजरा होत आहे. गोदावरी ते नर्मदा या जलप्रवासाच्या माध्यमातून जलजागृतीचा जागर करण्यात येत आहे.


यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, “ही केवळ शासकीय मोहीम नसून एक लोकचळवळ आहे. या जनजागृती यात्रेचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाचे काम अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. निळवंडे धरणासारख्या प्रकल्पाला ५२ वर्षे लागणे ही खेदाची बाब असून, विलंबामुळे प्रकल्पांची किंमत वाढते. मात्र, आता दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नातील ‘नदी जोड प्रकल्पा’ला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे, ही आनंदाची बाब आहे. जलव्यवस्थापनाची जबाबदारी केवळ अधिकाऱ्यांची नसून प्रत्येक कार्यकर्ता आणि शेतकऱ्याची आहे.”

या पंधरवड्यात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे

१५ एप्रिल: जलसंपदा पंधरवडा शुभारंभ.
१६ एप्रिल: कर्मचारी प्रशिक्षण.
१७ एप्रिल: कार्यालय स्वच्छता व रेन वॉटर हार्वेस्टिंग.
१८ ते १९ एप्रिल: शेतकरी संवाद आणि ‘जागतिक महिला शेतकरी वर्ष’ निमित्त विशेष कार्यक्रम.
२० ते २२ एप्रिल: भूसंपादन अडचणींचे निराकरण, कालवा पाहणी, नदी प्रदूषण नियंत्रण आणि उपसा सिंचन तक्रार निवारण.
२३ ते २५ एप्रिल: पीक पद्धती बदल, ई-प्रणाली जनजागृती आणि विद्यापीठांसोबत संवाद.
२५ ते २९ एप्रिल: विशेष आकर्षण – ‘गोदावरी ते नर्मदा जलदिंडी’.
३० एप्रिल: पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर समारोप व उत्कृष्ट अभियंत्यांचा सत्कार.

या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता अमोल कवडे, माजी अभियंता उत्तमराव निर्मळ, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, भाजपा शहराध्यक्षा पायल ताजणे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे, हरिभाऊ चकोर, रणजित जाधव यांसह जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कवडे यांनी केले, तर उत्तमराव निर्मळ यांनी जलव्यवस्थापनाच्या तांत्रिक आणि व्यावहारिक बाजू मांडल्या. शेवटी महेश गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *