अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा डावा आणि उजवा कालव्याच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणाच्या कामाचा ऐतिहासिक शुभारंभ जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे कालव्यांची पाणीवहन क्षमता वाढणार असून, लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील बाजारतळावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी, प्रतापपूर शिवारातील डाव्या कालव्यावर महापूजा करून आणि कुदळ मारून या कामाचा विधिवत प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळीग्राम होडगर होते.
यावेळी ना. विखे पाटील म्हणाले की, प्रवरा डावा आणि उजवा कालवा हे १०० ते १२० वर्षे जुने आहेत. प्रदीर्घ काळामुळे या कालव्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली असून पाणी गळतीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. याचा थेट फटका सिंचन व्यवस्थेला बसत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत’ या दुरुस्तीच्या कामांना विशेष मंजुरी मिळवण्यात आली आहे.
कालव्याच्या अस्तरीकरणावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा समाचार घेताना ना. विखे पाटील म्हणाले की, एकूण ७२ किमी अंतरापैकी केवळ ८ किमी अंतरावर जिथे मोऱ्या आहेत, तिथेच अस्तरीकरण होणार आहे. उर्वरित कालव्याला कोठेही अस्तरीकरण केले जाणार नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. अशा भूस पांगवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. काम पूर्ण झाल्यावर विरोधकांना याच कालव्यात आंघोळ घाला, अशा कडक शब्दांत त्यांनी टीका केली.
कालव्याच्या माध्यमातून ७ हजार हेक्टर क्षेत्र भिजत असताना अनेक ठिकाणी चाऱ्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. ही सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे ‘पत्रक क’ नुसार चोख नियोजन केले होते मात्र त्याच दिवशी पावसाला सुरुवात होवून सर्व धरण भरली असे म्हणत आता दरवर्षी असे पत्रक काढावे म्हणजे पाऊस पडत जाईल असे गमतीने ना. विखे पाटील, म्हणाले .
यावेळी ना. विखे पाटील यांनी रेल्वे मार्गाचाही उल्लेख करताना म्हणाले की ,. “संगमनेर मार्गे रेल्वे व्हावी ही माझी ठाम भूमिका आहे. शिर्डी या साईबाबांच्या दरबारात रेल्वे येणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते संगमनेरच्या विकासासाठीही गरजेचे आहे. या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून ही रेल्वे संगमनेरला येईलच,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रवरा डावा कालवा (७६.८ किमी) आणि प्रवरा उजवा कालवा (४४.८ किमी) या दोन्ही कालव्यांद्वारे संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी या पाच तालुक्यांतील सुमारे २३ हजार ७७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा थेट लाभ होतो. या आधुनिकीकरणामध्ये मातीकाम, जलसेतू, रस्ते पूल, पादचारी पूल आणि मुख्य विमोचकांची दुरुस्ती केली जाणार आहे. ब्रिटिशकालीन असलेल्या या कालव्यांच्या क्षमतेत वाढ झाल्यामुळे पाण्याची गळती थांबणार आहे.
यावेळी कैलासराव तांबे, भगवानराव इलग, नारायण कहार, रामभाऊ भूसाळ , सरुनाथ उंबरकर गणपतराव शिंदे,प. स. माजी सदस्य तबाजी मुन्तोंडे ,विजय म्हसे, ॲड पोपटराव वाणी , सौ. रोहिणीताई निघुते, जोंधळे, मच्छिंद्र थेटे, आर डी कदम रिपाईचे आशिष शेळके, ऍड.अनिल भोसले,रमेशराव गीते,संदीपराव घुगे, सतिषराव जोशी ऍड रवींद्र शेळके, मोहीत गायकवाड , लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, अभियंता प्रमोद माने, बांधकाम अभियंता काशिनाथ गुंजाळ , अमित प्रधान , पो नि सुदाम शिरसाठ, आश्वी संरपच नामदेव शिंदे ,जेहूरभाई शेख, अशोक जऱ्हाड, अनिल म्हसे, राजेंद्र जाधव सुनिल मुन्तोंडे , शिवाजीराव इलग , भिमा शिदे , गणेश भूसाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.