दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्यधोका वाढला; तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या मानोटी नाल्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

गुंजाळवाडी चौफुली परिसरापासून दगडी फुल, खटकाळी मळा, लक्ष्मी नगर ते एका रुग्णालयापर्यंत या नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांना डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विविध आजारांचा धोका वाढला असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक विशेषतः प्रभावित होत आहेत. घुलेवाडी हद्दीतून येणारा मानोटी नाला हा परिसरातील महत्त्वाचा निचरा मार्ग आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून या नाल्यात सांडपाणी मिसळत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांची वाढ यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.

 

स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे सांडपाणी व्यवस्थापनाबाबत मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गावचे सरपंच दररोज या मार्गाने ये-जा करत असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.


“या नाल्यातून सांडपाणी वाहत असताना ते दिसत नाही का?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या वाढत असून प्रशासनाने तातडीने नाल्याची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि डास नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मानोटी नाल्यातून गेले अनेक वर्षापासून खराब पाणी वाहत आहे… सदर खराब सांडपाणी व्यवस्थांबाबत वारंवार ग्रामसभेमध्ये मागणी करूनही गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अमोल गुंजाळ यांचे दुर्लक्ष होत आहे

 

 

श्री रोहिदास गुंजाळ
तंटामुक्ती माजी अध्यक्ष गुंजाळवाडी

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *