मतदानात संगमनेरकरांनी दिला ‘अश्वारूढ’ स्मारकाला कौल
आमदार सत्यजीता तांबे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मारकाबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून, संगमनेरकरांनी पारदर्शक मतदान प्रक्रियेद्वारे ‘पूर्णाकृती अश्वारूढ स्मारका’ला आपली स्पष्ट पसंती दर्शविली आहे. या निर्णयामुळे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भव्य स्मारकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

संगमनेर शहरात शिवस्मारक उभारावे, ही सर्वसामान्य नागरिकांची जुनी मागणी होती. या जागेचा लढा २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात सुरू झाला होता. त्यांनी बस स्थानक परिसरातील जागा स्मारकासाठी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव मंत्रालयास्तरावर ताकदीने पुढे नेला. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

२०२३ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ‘विशेष बाब’ म्हणून बस स्थानकासमोरील जागा नगरपालिकेकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली.

लोकशाही पद्धतीने निवडले स्मारक
जागा उपलब्ध झाल्यानंतर स्मारकाचे स्वरूप कसे असावे, याचा निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली ५ ते ७ मार्च दरम्यान शहरात भव्य मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेत १२,०८६ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
मतदानाचा निकाल खालीलप्रमाणे
अश्वारूढ स्मारक (पूर्णाकृती): ६,५६४ मते (विजेता पर्याय)
उभे स्मारक: ४,७६१ मते
- सिंहासनाधीश्वर स्मारक: ७६१ मते
बहुमताचा आदर करत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अश्वारूढ स्मारकाच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या स्मारकाबाबत माहिती देताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, “या स्मारकासाठी साधारण दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांतून निधी उपलब्ध केला जाईल, तसेच लोकसहभागातून देखील निधी उभारला जाईल. हे स्मारक केवळ संगमनेरचेच नव्हे, तर राज्याचे आकर्षण ठरेल.”
संगमनेरकरांच्या भावनांची दखल घेत स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संगमनेरकरांच्या वतीने आभार मानण्यात आले. गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.



