संगमनेर । झुंझार न्यूज

 


सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करणाऱ्या संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कारखान्याच्या कामकाजाची पाहणी करत व्यवस्थापनाचे कौतुक केले.

कारखान्यावर आगमन झाल्यानंतर नामदार छगन भुजबळ यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर तालुका युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात आणि नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

नामदार भुजबळ यांनी कारखान्याच्या विविध विभागांना भेटी देऊन ऊस गाळप क्षमता, उपपदार्थ निर्मिती आणि शेतकरी हिताच्या योजनांची माहिती घेतली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी लावलेले हे सहकाराचे रोपटे आज एक वटवृक्ष झाले असून, राज्याच्या सहकार चळवळीत या कारखान्याचे मोठे योगदान असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या सोहळ्याला कारखान्याचे संचालक मंडळ, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी नामदार भुजबळ यांना कारखान्याच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. डॉ. सुधीर तांबे यांनी भुजबळ यांच्याशी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली.

या भेटीमुळे संगमनेरच्या सहकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मंत्री महोदयांनी कारखान्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed