आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील समस्त आंबेडकरी समाज बांधव आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि समाजहिताच्या मागणीला बळकटी देण्यासाठी रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी संगमनेर येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही महत्त्वपूर्ण बैठक संगमनेर येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११:०० वाजता पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण उपवर्गीकरणाचा जो मुद्दा ऐरणीवर आला आहे, त्याला विरोध दर्शवण्यासाठी आणि हे उपवर्गीकरण रद्द व्हावे, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीचे आयोजन ‘ आरक्षण बचाव कृती समिती‘ यांच्या वतीने करण्यात आले असून तालुक्यातील सर्व आंबेडकरी संघटना, विविध राजकीय पक्षांमधील आंबेडकरी विचारधारेचे नेते, सर्व गटांचे पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने आशिष शेळके यांनी केले आहे . ही लढाई समाजाच्या हक्कांची आणि आरक्षणाच्या मूळ संरचनेच्या रक्षणाची आहे. त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक निमंत्रणाची, फोनची किंवा मेसेजची वाट न पाहता, प्रत्येक आंबेडकरी अनुयायाने स्वतःहून या बैठकीला उपस्थित राहावे.
आरक्षण उपवर्गीकरणामुळे समाजाच्या आरक्षणावर काय परिणाम होतील आणि त्याविरोधात कशा प्रकारे आंदोलनाची दिशा निश्चित करावी, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.