संगमनेर । झुंझार न्यूज
“सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत. त्यामुळे आता महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घातला पाहिजे. व्यसनमुक्त गाव हेच खऱ्या अर्थाने समृद्ध गाव असू शकते,” असे परखड मत पाटोदा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले. संगमनेर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी पेरे पाटील यांनी आपल्या खास शैलीत ग्रामविकास, व्यसनमुक्ती, पर्यावरण आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत उपस्थितांची मने जिंकली. “आपले गाव हेच आपले तीर्थ आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. जर देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचे असेल, तर सर्वात आधी गाव आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

‘प्लास्टिक ही चांगदेवाची अवलाद‘
पर्यावरणाबद्दल बोलताना पेरे पाटील यांनी प्लास्टिक प्रदूषणावर सडकून टीका केली. “प्लास्टिक ही चांगदेवाची अवलाद आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्लास्टिकच्या विळख्याबाबत संताप व्यक्त केला. गाव स्वच्छ ठेवायचे असेल तर प्लास्टिकचा वापर टाळा आणि प्लास्टिक जाळू नका, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, “प्रत्येक गावात वडाची झाडे लावा; वड स्वतःचाच ठेवा, दुसऱ्याच्या वडाची पूजा करू नका,” असे सांगत त्यांनी स्वावलंबन आणि स्वत्वाची जाणीव करून दिली.

भेसळीच्या अन्नापासून सावध राहा
बाहेरच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या भेसळीबाबत त्यांनी महिलांना सतर्क केले. “धने, जिरे, हळद, तिखट, जवस आणि खाद्यतेलातही भेसळ वाढली आहे. अशा भेसळयुक्त अन्नामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे घरच्या अन्नाला प्राधान्य द्या आणि भेसळीपासून सावध राहा,” असे आवाहन त्यांनी केले.

भ्रष्टाचार आणि बालविवाहावर प्रहार
अकोले तालुक्यातील अल्पवयीन विवाहांच्या (बालविवाह) वाढत्या घटनांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ग्रामपंचायतींनी अशा प्रकरणांत कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. “लोकांचे रक्त पिऊ नका, भ्रष्टाचारापासून दूर राहा. कलेक्टर होता येत नसेल तर किमान कलेक्टरचा बाप व्हा (मुलांना उच्चशिक्षित करा),” असा मार्मिक संदेश त्यांनी तरुणांना दिला.

पाटोदा गावचा आदर्श
आपल्या भाषणात त्यांनी पाटोदा गावात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गावात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे, निराधारांसाठी मोफत भोजन व्यवस्था, वृक्षलागवड आणि दररोज होणारे राष्ट्रगीत यांमुळे गावाचा कायापालट कसा झाला, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. “प्रामाणिकपणे काम केले तर समाज त्याची दखल घेतोच,” असे ते म्हणाले.
महिलांना ‘अजब’ पण अर्थपूर्ण सल्ला!
व्यसनमुक्तीवर बोलताना पेरे पाटील यांनी महिलांना एक मिश्कील पण अंतर्मुख करणारा सल्ला दिला. ते म्हणाले, “जर पती दारू पिऊन घरी आला तर घराचा दरवाजा उघडू नका. इतकेच नाही तर, महिलांनो, तुम्हीच दारू प्यायला सुरुवात करा, मग पुरुषांना त्याचे दुष्परिणाम आणि घरातील परिस्थिती समजेल.” त्यांच्या या विधानामुळे सभागृहात हशा पिकला असला, तरी त्यामागील दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराची व्यथा त्यांनी अत्यंत गंभीरपणे मांडली.

