Oplus_131072

आरक्षण बचाव’च्या घोषणांनी शहर दणाणले

राहुरी । झुंझार न्यूज

अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने बुधवारी राहुरी तहसील कार्यालयावर धडक महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो भीमसैनिक आणि आंबेडकरी समाजबांधवांनी सहभाग नोंदवून आपला तीव्र निषेध व्यक्त केला.

Oplus_131072

बुधवारी सकाळी शहरातील राजवाडा परिसरात तालुक्यातील कानाकोपऱ्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. हातात निळे झेंडे, ‘आरक्षण बचाव’ आणि ‘उपवर्गीकरण रद्द करा’ अशा घोषणांचे फलक घेऊन आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेला हा भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.


मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या वतीने श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवार आणि राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारला अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र, यामुळे अनुसूचित जाती समाजातील एकतेला धोका निर्माण होऊन समाजात फूट पडण्याची शक्यता आहे.


आंदोलकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
१. अनुसूचित जाती प्रवर्गात कोणतेही उपवर्गीकरण करण्यात येऊ नये.
२. न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल तातडीने जाहीर करावा.
३. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी.
४. संसदेत विशेष कायदा करून अनुसूचित जाती आरक्षणाला घटनात्मक संरक्षण द्यावे.

या महामोर्चाचे नेतृत्व आणि नियोजन अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीने केले होते. यामध्ये आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब जाधव, प्रवीण लोखंडे, सुभाष त्रिभुवन, पिंटू साळवे, सचिन साळवे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, सागर साळवे, विवेक सगळगिळे, संजय संसारे, दीपक साळवे, अजय साळवे, अजिंक्य शिंदे, दादू साळवे, किरण साळवे, भूषण साळवे, प्रतीक रूपटक्के, राज ब्राम्हणे यांची उपस्थिती होती.


तसेच महिला आघाडीच्या सुनीता थोरात, सीमा बोरुडे, स्नेहल सांगळे, यमुना भालेराव, स्नेहल दिवे आणि सुनील चांदणे यांच्यासह हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.


मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चामध्ये तरुणांचा आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी यावेळी घेतला .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *