रामकथेने संगमनेरचा गुंजाळ मळा भक्तीरसात न्हाऊन निघाला!
दीड लाख भाविकांची अलोट गर्दी; रामायणाचार्य ढोक महाराजांच्या वाणीतून गुंजाळवाडीत अवतरले ‘रामायण‘
संगमनेर । झुंझार न्यूज
“रामभक्ती, तपश्चर्या आणि ईश्वरनिष्ठा हे मानवी जीवनाचे आधारस्तंभ आहेत. पूजनीय गगनगिरी महाराज हे आमचे ‘राम’ असून, ते या युगातील एक महान आत्मिक आणि आध्यात्मिक चमत्कार आहेत,” अशा शब्दांत प्रसिद्ध रामायणाचार्य ढोक महाराज यांनी प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांचा गौरव केला. गुंजाळवाडी येथील गुंजाळ मळ्यात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ढोक महाराजांच्या रसाळ वाणीतून रामकथेचे निरूपण सुरू असून, या सोहळ्याने भक्ती, लोककल्याण आणि समाजसेवेचा एक अभूतपूर्व संगम घडवून आणला आहे.

स्व. जयवंतराव गुंजाळ व श्री. बाळासाहेब गुंजाळ यांच्या वतीने आयोजित या सप्ताहात रामकथा ऐकण्यासाठी सुमारे दीड लाख भाविकांनी अलोट गर्दी केली असून, संपूर्ण परिसर जणू ‘राममय’ झाला आहे.

शबरी आणि हनुमंताच्या भक्तीचा महिमा
कथेच्या ओघात ढोक महाराजांनी शबरी, जटायू, संपाती, हनुमान आणि विभीषण यांच्या प्रसंगांचे हृदयस्पर्शी वर्णन केले. शबरीच्या भक्तीवर बोलताना ते म्हणाले की, “शबरीकडे कोणतेही वैभव नव्हते, पण प्रभूंचे चरण धुण्याची पात्रता तिच्या अंत:करणात होती. ती केवळ भक्त नव्हती, तर तिच्यात कौशल्या मातेचे वात्सल्य दडलेले होते.” यावेळी “मेरी झोपडी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे” या भजनाने उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले.

संपाती आणि जटायू यांच्या त्यागाचा उल्लेख करताना महाराजांनी सांगितले की, रामनामाच्या स्मरणाने संपातीच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य निर्माण झाले. रामकृपा हीच खरी नवसंजीवनी असून, ती प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश आणू शकते. लंकेतील हनुमंताचा पराक्रम आणि सीतामातेची व्याकुळता यांचे वर्णन करताना त्यांनी धर्माच्या विजयाची महती सांगितली.

कुटुंब आणि समाजासाठी ‘अयोध्याकांड’ आदर्श
आजच्या धावपळीच्या युगात अयोध्याकांडाचे महत्त्व सांगताना ढोक महाराज म्हणाले की, “भावा-भावातील प्रेम आणि आईबद्दलचा आदर जपण्यासाठी रामायणातील पात्रे आजही आदर्श आहेत. मोठ्या व्यक्तींचे संस्कार आणि प्रभू श्रीरामांचे चरित्र मानवजातीला सदैव प्रेरणा देत राहील.
विखे पाटलांच्या चार पिढ्या महाराष्ट्राचे महान संचित : ढोक महाराज
कथा निरूपण सुरू असताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून रामकथेचे श्रवण केले. यावेळी ढोक महाराजांनी विखे पाटील परिवाराच्या समाजसेवेचा गौरव केला. ते म्हणाले, “विखे पाटलांच्या चार पिढ्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. हे केवळ राजकीय घराणे नसून जनसामान्यांच्या हिताचे रक्षण करणारे एक महान संचित आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्व लोकाभिमुख आणि संवेदनशील आहे.”

भारत आध्यात्मिक वैभवाने समृद्ध होईल : दिलीप शिंदे
या प्रसंगी आपले विचार मांडताना दिलीप शिंदे म्हणाले की, “समाजात मूल्यांची जोपासना करण्यासाठी साधूसत्ता, लोकसत्ता आणि राजसत्ता यांचा समन्वय असणे आवश्यक आहे. संतांचे मार्गदर्शन आणि राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती यांचा संगम झाल्यास भारत केवळ प्रगत राष्ट्रच नाही, तर आध्यात्मिक वैभवाने नटलेले ‘कैवल्यधाम’ बनेल.

या अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन प. पू. गगनगिरी महाराज सप्ताह समितीच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. भाविकांसाठी महाप्रसाद आणि इतर सोयीसुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली असून, या सप्ताहामुळे लोककल्याणाची उज्ज्वल परंपरा अधिक बळकट होत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.

