संगमनेर । झुंझार न्यूज
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या खेती बचाव अभियान कार्यक्रमांतर्गत माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात जमीन सुपीकता शाश्वत शेती याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती बाबत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. एस बी खरबडे, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन नलावडे, कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ कदम, प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ, डॉ रवी आंधळे, श्री सोनार , प्रबंधक प्रा जी.बी बाचकर प्रमोद देशमुख, सागर वाकचौरे आदी उपस्थित होते.

गुंजाळवाडी येथे सुरू असलेल्या विश्व गौरव विभूषित परमपूज्य स्वामी गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहात या महाविद्यालयाने विविध शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाच्या बाबत माहिती दिली आहे. यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, दिलीपराव शिंदे, यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली.
याप्रसंगी डॉ. एस बी खरबडे यांनी, सरकारच्या खेती बचाव अभियानाचे मुख्य उद्दिष्टे व माहिती शेतकऱ्यांना दिली. जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी मृदा परीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर ,संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले.
तर प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतीचा स्वीकार करून उत्पादन वाढीचा पर्यावरण संवर्धन साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाय योजना सांगितल्या.
यावेळी दररोज येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येत असून या अभियानामुळे पीक संरक्षण, मृदा संवर्धन आणि शाश्वत शेती उपयुक्त माहिती मिळाल्याची भावना सर्व शेतकरी व भाविकांनी व्यक्त केली.

या उपक्रमाबद्दल महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे ,संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ जयश्रीताई थोरात , मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
